Talegaon News: आत्मनिर्भर भारतासाठी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा – डाॅ. माशेलकर 

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी वाट दाखवण्याचे काम हे शिक्षकांचे असून आत्मनिर्भर भारतासाठी आत्मविश्वास गरजेचा आहे हा विद्यार्थांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांनी शिक्षकदिनी मार्गदर्शन करताना  व्यक्त केले.

शिक्षकदिनाचे औचित्य साधत तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्था, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, स्नेहवर्धक मंडळ, प्रतिभा इन्स्टिट्यूट व तळेगाव मधील सर्व शैक्षणिक संस्था यांच्या वतीने मावळ तालुक्यातील सर्व शिक्षकांसाठी झुम अॕप व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून डाॅ. रघुनाथ माशेलकर यांचे ऑनलाईन व्याख्यान झाले.  त्यावेळी मार्गदशन करताना डाॅ माशेलकर यांनी हे मत व्यक्त केले.

दरवर्षी पाच सप्टेंबर हा शिक्षकदिन या शैक्षणिक संस्था आपल्या संस्थेतील सर्व  शिक्षकांचा सन्मान करत असतात यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा काॅलेज बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे या काळात शिक्षकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी सकाळी दहा वाजता ऑनलाईन  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

 या ऑनलाईन कार्यक्रमात एक हजार शिक्षकांनी तर अनेकजणांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ह्या व्याख्यानाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार कृष्णराव भेगडे, त्रिदल पुणे संस्थापक सतीश देसाई, लायन्स माजी पुणे जिल्हा प्रांतपाल राजेंद्र मुच्छाल हे उपस्थित होते.

डॉ. माशेलकर म्हणाले की, बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षण पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे म्हणजेच डिजीटल शिक्षणतंत्राचा वापर करणे  आवश्यक आहे.  शिक्षक दिन हा रोज असावा व शिक्षक दिन हा भविष्य दिन म्हणून देखील ओळखला जावा.

यावेळी अनेक शिक्षकांनी डॉ. माशेलकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्न विचारले या सर्व प्रश्नाचे निरासन या व्याख्यानात केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक इंद्रायणी विद्यामंदिराचे कार्यवाह रामदास काकडे यांनी, सूत्रसंचालन शैलेश शहा यांनी तर आभार राजेश म्हस्के यांनी मानले.

हा कार्यक्रम मावळ तालुक्यातील जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचावा व हे व्याख्यान ऐकावे यासाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे व संचालक महेशभाई शहा यांनी विशेष प्रयत्न केले.

 या कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्प प्रमुख शैलेश शहा, सहप्रकल्प प्रमुख राजेश म्हस्के, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.