Talegaon News: कुंडमळ्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसानंतरही सापडेना

तरबेज आपल्या तीन मित्रांसोबत तळेगावजवळ इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळ्यात वर्षाविहारासाठी आला होता.

एमपीसी न्यूज – वर्षाविहारासाठी तळेगाव जवळील कुंडमळा धबधब्यात आलेला पिंपरीतील तरुण बुडाला. त्याचा मृतदेह दोन दिवसानंतरही सापडलेला नसून एनडीआरएफचे पथक त्याचा शोध घेत आहे. ही घटना मंगळवारी (दि.18) दुपारी घडली.

तरबेज शाहजान पटेल (वय 30, रा. खराळवाडी, पिंपरी) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

तळेगाव एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरबेज आपल्या तीन मित्रांसोबत तळेगावजवळ इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळ्यात वर्षाविहारासाठी आला होता. दुपारी चप्पल धुण्यासाठी तो पाण्यात गेला असता त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने त्याला काठावर येता आले नाही. त्यामुळे तो वाहून गेला.

आपल्या डोळ्यादेखत आपला मित्र वाहून गेल्याने घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार, तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरुवातीला नदीपात्राच्या परिसरात शोध घेतला. मात्र, तरबेजचा पत्ता लागला नाही.

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एनडीआरएफच्या पथकाला याबाबत माहिती दिली आहे. मात्र रात्र झाली असल्याने तसेच पाण्याचा प्रवाह धोकादायक असल्याने एनडीआरएफच्या जवानांनी पाण्यात उतरण्यास नकार दिला.

बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून एनडीआरएफच्या पथकाने शोध घेतला. सायंकाळी सहा वाजता त्यांची शोध मोहीम थांबली. गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून ही शोधमोहीम पुन्हा सुरु झाली आहे. एनडीआरएफच्या पथकासोबत आणखी एका स्वयंसेवी संस्थेचे पथकही शोध घेत आहे.

याबाबत अद्याप कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. तरबेजचा शोध लागल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.