Talegaon News: पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक परवानगीच्या निर्णयाचे तळेगाव एसटी आगाराकडून स्वागत

तळेगाव दाभाडे – महाराष्ट्र राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने सेवा करण्याची परवानगी दिल्यानंतर  दि.18 रोजी या शासकीय निर्णयाचे तळेगाव दाभाडे एसटी आगारातून प्रवासी, वाहक, चालक यांचेकडून स्वागत करण्यात आले.
मार्चपासून लॉकडाऊन मुळे सर्व प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. यावर 20 जुलैला शासनाने सोशल डिस्टंसिंग पाळत बसच्या क्षमतेच्या निम्मे प्रवासी घेऊन वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली होती. या पद्धतीमुळे प्रवाशांची होणारी कोंडी व महामंडळाचे होणारे नुकसान डोळ्यासमोर ठेवून शासनाने पूर्ण  क्षमतेने वाहतुकीस परवानगी दिली आहे.
 तळेगाव आगरामधून मावळ तालुक्यांमध्ये स्थानिक पातळीवर दहा बस व बाहेर जिल्ह्यांमध्ये सात एसटी बस पाठवल्या जातात. यामध्ये प्रवाशांच्या गर्दीचे प्रमाण कमी असेल तर नुकसानीला सामोरे जावे लागते. शासनाच्या या निर्णयामुळे प्रवासाच्या गर्दीचे प्रमाण वाढल्यानंतर पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे प्रवासी वाहतुकीचे काम सुरू करण्यात येईल, असे आगार प्रमुख प्रमोद दहातोंडे व स्थानक प्रमुख सोपान सांगडे यांनी सांगितले.
शासनाच्या नवीन धोरणानुसार प्रवासी वाहतूक करताना प्रवाशांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा  वापर करणे गरजेचे आहे. प्रवासासाठी गाडी आगारातून जाताना व आल्यानंतर तिचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. या सुरू झालेल्या सेवेचा नागरिकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुख प्रमोद दहातोंडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.