Talegaon News : समाजातील भेदाच्या भिंती पाडणारा समतेचा ध्वज महत्त्वाचा : बाळासाहेब थोरात

डॉ. संभाजी मलघे यांच्या 'समतेचा ध्वज' समीक्षाग्रंथाचे मंत्री थोरात व राजेश टोपे यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज – आज समाजात भेदाच्या भिंती उभ्या आहेत. त्यामुळे समाजात समतेच्या विचारांची गरज आहे, अशावेळी भेदाच्या भिंती पाडणारा ‘समतेचा ध्वज’ खूप महत्त्वाचा ठरतो, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, शिक्षणतज्ज्ञ अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाचे पुण्यातील एसएम जोशी सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांची चिंतनशील कविता ‘समतेचा ध्वज’ या इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांच्या समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, अरुण गुजराथी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी.डी. पाटील, सचिन इटकर, ज्येष्ठ कवियत्री अनुराधा पाटील, विलास शिंदे, डॉ. राजू शिंदे, ज्येष्ठ कवी उद्धव कानडे, सीमा मलघे, प्रा. विश्वास वसेकर आदी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, की ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांच्या चिंतनशील कवितांचे संपादन प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी उत्तम केले आहे. प्रा. विश्वास वसेकर यांची प्रस्तावना अभ्यासपूर्ण आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने या ग्रंथांची देखणी निर्मिती केली आहे, असे सांगत त्यांनी एक कविताही वाचून दाखवली. ‘माती सुखानं सांगते, पिक घामानं फुलते, घाम उरात खेळता माती सत्यानं डोलते, घाम गाळताना धनी मनामधी भेगाळतो, रान नटून जाताना धनी मनात नटतो,’ ही कविता सादर करताना ते म्हणाले, ही तर घामाची, कष्टाची, दुःखाची, समतेची कविता आहे. या कवितेला माणूसपणाच्या सुंदरतेचा आणि घामाचा वास आहे, म्हणून प्राचार्य मलघे यांचा समतेचा ध्वज महत्त्वाचा आहे.

डॉ. संभाजी मलघे यांनी सांगितले, की समतेचं गाणं गाणारा, मानवतेला कवेत घेणारा, माणूस धर्माला सुंदरता प्रदान करणारा उद्धव कानडे हा कवी मला सतत खुणावत गेला. अनुभवांशी इमान राखणाऱ्या या कवीच्या कवितेतील अर्थपूर्णता आणि कलात्मकता शोधण्याचा मी प्रयत्न ‘समतेचा ध्वज’ या ग्रंथातून केला आहे. वाचकांना, अभ्यासकांना हा ग्रंथ उपयोगी ठरेल.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मान्यवरांनी या ग्रंथाचे कौतुक केले. तसेच मराठी भाषा अभ्यासकांना हा समीक्षाग्रंथ निश्चित उपयोगी ठरेल, अशा भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.