Talegaon News : माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांना धमकीचे फोन; नाईक यांची पोलीस आयुक्तांकडे धाव

तळेगाव दर्गा प्रकरणी लक्ष न घालण्याची नाईक यांना धमकी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील दर्गा व्यवस्थापन आणि मालकी हक्क याबाबतच्या एका प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पडू नये, यासाठी त्यांना दाभाडे आणि शिंदे कुटुंबातील सदस्यांनी फोन करून धमकावले असल्याचे नाईक यांनी सांगितले. याबाबत नाईक यांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेत आपली कैफियत निवेदनाच्या माध्यमातून मांडली आहे.

नाईक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी समाजातील, गोरगरीब शोषित, त्रस्त, गरजवंत यांना सामाजिक बांधिलकी समजून तसेच माझ्या कामाचा भाग म्हणून विनामूल्य तसेच तळमळीने त्यांच्या मदतीसाठी धावून जातो. अशाच एका प्रकरणात माझ्याकडे तळेगाव दाभाडे येथील बेग कुटूंब त्यांची कैफियत घेऊन आले. गेल्या तीन पिढ्यांपासून त्यांच्याकडे दर्गा व्यवस्थापन व देखभाल हे काम आहे. बेग कुटुंब तेथेच राहतात. भाविक जे काही देणगी वगैरे देतात त्यावर आपला चरितार्थ चालवतात.

असे असताना गावातील स्थानिक प्रतिष्ठित कुटुंब, त्यांचे नातेवाईक आणि त्यांना छुप्या पद्‌धतीने राजकीय पाठिंबा देणारे इत्यादी लोकांकडून बेग कुटुंबाला त्रास दिला जात आहे. या प्रकरणात लक्ष घातल्याने नाईक यांना दाभाडे आणि शिंदे कुटुंबातील सदस्यांनी फोन करून ‘हे उद्योग बंद कर. गावातल्या स्थानिकांना साथ द्यायची सोडून तू त्या लोकांना साथ देत आहेस. हे बरे होणार नाही. आम्ही येथील स्थानिक आहोत’ अशी धमकी दिली आहे.

या संदर्भात नाईक यांनी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे निवेदन दिले आहे. आपल्या जीवितास धोका निर्माण झाला असून पोलीस संरक्षण देण्याची मागणी देखील नाईक यांनी आयुक्तांकडे केली आहे.

प्रदिप नाईक म्हणाले, “समाजातील, शोषित, पीडित, वंचित लोकांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज पद्धतशीरपणे शांत करण्याचे षडयंत्र या मागे आहे. तळेगाव परिसरातील सतीश शेट्टी यांची हत्या हे या प्रवृत्तीचे निदर्शक आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही एखाद्याला संपवू शकता. पण त्याच्या विचारांना मात्र संपवू शकत नाही. असा माणूस त्याच्या विचारांनी या जगात दीपस्तंभाप्रमाणे रहातो. याचे उत्तम उदाहरण परमपूज्य महात्मा गांधी यांचे देता येईल. ते आज लौकिक अर्थाने आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांनी साऱ्या विश्वाला आदर्श घालून दिला आहे. माझ्या जीवनावर देखील महात्मा गांधींचा प्रभाव आहे.”

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.