Talegaon News: तळेगावात चोरलेले ट्रॅक्टर कर्नाटकमधून हस्तगत

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला. आरोपी ट्रॅक्टर चोरून त्यांच्या कर्नाटक राज्यातील मूळ गावी पसार झाले होते.

एमपीसी न्यूज – तळेगाव परिसरातून एका कामगाराने दोन ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना मे 2020 मध्ये घडली होती. तब्बल साडेतीन महिन्यानंतर तळेगाव पोलिसांना चोरी झालेल्या ट्रॅक्टरचा शोध लागला असून चोरीला गेलेले ट्रॅक्टर पोलिसांनी कर्नाटक राज्यातून हस्तगत केले आहे. तसेच पोलिसांनी ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे.

पिंटू उर्फ स्वप्नील मारुती राठोड (वय 20, रा. केसाळतांडा आळी, ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. सिध्दू भिकाजी लकडे (वय 30, रा. सिध्दवस्ती कुसाळवाडी मावडी कडेपठार ता. पुरंदर, जि.पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लकडे यांच्याकडे आरोपी पिंटू उर्फ स्वप्नील राठोड आणि अनिल राठोड हे दोघेजण काम करत होते. 11 मे दुपारी पाच ते 12 मे सकाळी आठ वाजताच्या सुमारास आरोपींनी सोमटणे फाटा येथून लकडे यांचे 10 लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला. आरोपी ट्रॅक्टर चोरून त्यांच्या कर्नाटक राज्यातील मूळ गावी पसार झाले होते.

तळेगाव पोलिसांनी सिंदगी गावात ट्रॅप लावून आरोपी पिंटु उर्फ स्वप्नील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून रामपूर गावात लपवून ठेवलेले 10 लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.