Talegaon News : सर्वसाधारण सभेच्या दोन दिवस अगोदर दोन नगरसेवकांचे पदाचे राजीनामे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील जनसेवा विकास समितीचे स्वीकृत नगरसेवक रवींद्र गंगाराम आवारे तसेच सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत नगरसेवक सुरेश यशवंतराव दाभाडे यांनी सर्वसाधारण सभेच्या दोन दिवस अगोदर त्यांच्या पदाचे राजीनामे मंगळवारी (दि. 15) जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहेत.

नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून स्वखुशीने राजीनामे  देत असून जिल्हाधिकाऱ्यांनी ते मंजूर केले असल्याचे दोघाही नगरसेवकांनी सांगितले. तसेच आपल्या कारकिर्दीत कामकाजावर आपण समाधानी असल्याचे ते म्हणाले.

14 ऑगस्ट 2019 रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहात स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवडणूक झाली होती. त्यावेळी रवींद्र आवारे, सुरेश दाभाडे आणि तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गणेश काकडे यांची बिनविरोध निवड झाली होती.

_MPC_DIR_MPU_II

तत्कालीन भाजपाचे नगरसेवक आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने प्रभाग क्रमांक सात मध्ये पोटनिवडणूक झाली. तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या संगीता शेळके या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. त्यानंतर तत्कालीन भाजपाचे नगरसेवक संदीप शेळके यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने प्रभाग क्रमांक एक मध्ये पोटनिवडणूक झाली. या ठिकाणी जनसेवा विकास समितीचे नगरसेवक निखिल भगत बिनविरोध निवडून आले. या दोन्ही पोटनिवडणुकीमुळे काही काळ आचारसंहिता लागली होती. त्यामुळे नगरपरिषदेत सभा होऊ शकल्या नाहीत, त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभागृहात मोजक्याच सभा झाल्या.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची गुरुवारी (दि. 17) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वसाधारण सभा होणार आहे. तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समितीने या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहिर केला आहे.

सर्वसाधारण सभेपूर्वीच दोघांनीही राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.