Talegaon News: अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून सोमाटणे फाटा ते लोणावळा येथे जात असलेल्या एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 21) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास पायोनियर हॉस्पिटल जवळ झाला.

आकाश अशोक कांबळे (वय 30, रा. लोणावळा), रोहित संजय ओव्हाळ (वय 31, रा. लोणावळा) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी तुषार शंकर भवार (वय 30, रा. सोमाटणे, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मावस भाऊ आकाश आणि रोहित रविवारी मध्यरात्री सोमाटणे फाटा येथून पल्सर दुचाकीवरून लोणावळा येथे घरी जात होते. सोमाटणे फाट्याजवळ पायोनियर हॉस्पिटल समोर त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत आकाश आणि रोहित यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच दोघांचा मृत्यू झाला.

घटना घडल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता पोलिसांना माहिती न देता पळून गेला. पोलीस परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे वाहन चालकाचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.