Talegaon News : नगरपरिषदेच्या मालकीचे रिक्त व्यापारी गाळे, महिला बचत गटांना नाममात्र भाडे तत्वावर द्यावेत – वैशाली दाभाडे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या मालकीचे रिक्त व्यापारी गाळे, महिला बचत गटांना नाममात्र भाडे तत्वावर द्यावेत अशी मागणी माजी उपनगराध्यक्षा, विद्यमान नगरसेविका वैशाली दाभाडे व सहकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. प्रभारी मुख्याधिकारी नानासाहेब कामठे व नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांना त्याबाबत निवेदन देण्यात आले.

दाभाडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने मारुती मंदिर चौक आणि जिजामाता चौक येथे भाड्याने उत्पन्न वाढीसाठी, व्यापारी गाळे भाडे तत्वावर न देता पडून आहेत. मारुती मंदिर चौकातील श्रीमंत सरदार अजितसिंह राजे दाभाडे सरकार व्यापारी संकुलात एकुण तीन इमारतीमध्ये 78 गाळे असून त्यातील अवघे 33 गाळे भाडे तत्वावर गेलेले आहेत, तर 45 गाळे रिकामे पडून आहेत. तर जिजामाता चौकातील कै. केशवराव वाडेकर व्यापारी संकुलातील एकुण 44 गाळे असून त्या पैकी फक्त 10 गाळे भाडे तत्वावर गेले आहेत व उर्वरित 34 गाळे विनावापराशिवाय पडून आहेत. असे एकुण 79 गाळे रिकामे पडून आहेत. उत्पन्नवाढीसाठी व्यापारी गाळे भाडेतत्वावर न देता पडून आहेत.

सध्या तळेगाव दाभाडे शहरात सुमारे 125 महिला बचत गट कार्यरत असून, त्यातील काही बचत गट आपआपल्या कौशल्यानुसार वस्तु उत्पादनाचे काम करीत आहेत. या बचत गटांना त्यांच्या प्रगतीसाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून व्यापारी संकुलातील रिकामे गाळे नाममात्र भाडे तत्वावर दिल्यास सोईचे होईल, तसेच महिला बचत गटांच्या कार्यास गती मिळेल. असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.

याबाबत नगराध्यक्षांनी पुढाकार घेऊन शासन व नगरपरिषद पातळीवर या महिला बचतगटांना व्यवसाय वृद्धीची संधी द्यावी.तसेच हा विषय आगामी सर्वसाधारण सभेपुढे ठेऊन मंजूर करून कार्यवाहीचे तातडीने आदेश द्यावेत, अशी विनंतीही नगरसेविका दाभाडे यांनी केली आहे. त्यामुळे महिला बचत गटांना आर्थिक संपन्नता येईल असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.