Talegaon News : कोरोना संकटात जनतेच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या नेत्या वैशाली दाभाडे

उपनगराध्यक्षा दाभाडे यांच्या सेवाभावी कार्याबद्दल नवी मुंबईच्या स्वाभिमानी महिला आधार उद्योग मंचाच्या वतीने दाभाडे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.

( प्रभाकर तुमकर  ) : राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देऊन जनतेच्या प्रश्नांना तडीस नेणाऱ्या, तळागाळातील लोकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचावी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध असावे, यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या महिला नेत्या म्हणून  तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली प्रमोद दाभाडे यांची ओळख आहे. त्यामुळेच  कोरोनाच्या काळात जनतेच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या उपनगराध्यक्षा दाभाडे इतरांपेक्षा सरस ठरत आहेत. हीच त्यांच्या जनसेवेची खरी पावती आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून वैशाली प्रमोद दाभाडे यांनी 2016 साली आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. तेव्हापासून त्यांनी आजपर्यंत आपल्या कुटुंबियांचा समाजकार्याचा वसा अविरत सुरु ठेवला. आजवर समाजकार्याला राजकारणाची जोड देत त्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

महिला सबलीकरण, सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, उद्योग यांसारख्या आदी बाबींवर विशेष कार्य करताना आलेल्या अनेक अडीअडचणींवर मात करीत आपले आधारस्तंभ व ज्येष्ठ मार्गदर्शक, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक व श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे (मामा) यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली त्यांची वाटचाल सुरु आहे.

7 फेब्रुवारी 2020 रोजी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाचा पदभार देण्याबरोबरच पक्षाने त्यांच्यावर पाणी समितीची पदसिद्ध पदाधिकारी म्हणून मोठी जबाबदारी दिली.

पक्षाने दाखविलेला विश्वास व मोठी जबाबदारी सांभाळत सहकारी, नगरसेवक, अधिकारी यांच्या सहकार्यातून कामाला सुरुवात केली.

कामाला सुरुवात करताच कोरोना या महाभयानक आजाराने धूमाकूळ घातला. निसर्ग चक्रीवादळाने पाणी योजना खंडित झाली. भली मोठी झाडे उन्मळून पडली, वीज खंडीत झाली, रस्ते बंद झाले. सर्व संकटांवर सामना करण्यासाठी त्यांनी नियोजनबद्ध फळी निर्माण करून त्यावर उपाययोजना केल्या.

याच काळात कोरोना महाआजाराने रोजगार गेलेल्यांच्या पोटासाठी शासनाला शिवभोजन थाळीची मागणी केली. तहसीलदारांना त्याबातचे निवेदन देत परिस्थितिचे गांभीर्य पटवून दिले.

लॉकडाउनच्या काळात आपापल्या गावी जाणाऱ्या कामगारांच्या कुटुंबांसाठी पोलीस व पालिका प्रशासनाच्या सहाय्याने परवाना, प्रवासातील खाण्यापिण्याची व्यवस्था म्हणून फूड पॅकेट व बाटलीबंद पिण्याचे पाणी यांची व्यवस्था केली.

शासनाकडून गरजू कुटुबांना दिले जाणारे धान्य प्रामाणिकपणे वितरण केले गेले पाहिजे अशा आग्रही सूचना करित परिसरातील धान्य वितरकांची भेट घेत त्याबाबत सूचना केल्या.

कोरोना संकटाच्या काळात कार्यरत असलेल्या आशा वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, पालिका कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पोलीस यंत्रणा आदींचा उपनगराध्यक्ष दाभाडे यांनी सन्मानपूर्वक गौरव केला व त्यांना, सन्मानपत्राचे वाटप करण्यात आले.

आपली सामाजिक बांधलकीच्या माध्यमातून सेवाकर्मीचा सन्मान तसेच विविध व्यक्ती आणि संस्थांना सढळ हाताने मदत करताना हॅन्ड सॅनिटायझर व फेस मास्कचे मोठ्या प्रमणावर वाटप केले.

दारु ही अत्यावश्यक बाब नाही. उलट त्याद्वारे समाजाला होणारा त्रास लक्षात घेता दारुची दुकाने खुली ठेवण्या ऐवजी होम डिलीवरी द्यावी, वीज मीटरचे रिडिंग न घेता वाढीव वीजबील आकारणाऱ्या महावितरणाला जाब विचारणे तसेच नगरपरिषदेने सुरु केलेले वाढीव वर्ग व यंदाचे उच्चांकी निकाल याबाबत गौरवोद्गार काढत मावळ तालुक्यात दुसरा आयटीआय तळेगावात उभारण्याचा ठाम निर्धार करण्याऱ्या वैशाली दाभाडे पहिल्या महिला पदाधिकारी ठरल्या.

वैशाली दाभाडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवशी वृक्षारोपण,खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी (सावली उपक्रमांतर्गत) महिला कर्मचाऱ्यांचा गौरव तर ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करून आपली पक्षनिष्ठा व सामाजिकतेची जोड घातली.

उपनगराध्यक्षा दाभाडे यांनी आजवर विविध उपक्रम राबविताना त्याचा गरजूंना पूरेपूर लाभ व्हावा या उद्देशाने वराळे येथील रुडसेट संस्थेत स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण, त्यासंबंधी मार्गदर्शन, संपर्क बालग्राम भाजे येथे अन्नदान व सॅनिटायझर वाटप, नगरपरिषद महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप, परिसरातील अंगणवाडी, माध्यमिक शाळा, पोलीस ठाणे यांसह जून्नर येथील राजाराम पाटील वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठी अन्नधान्य वाटप आदींचे यशस्वी आयोजन केले.

उपनगराध्यक्षा दाभाडे यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल नवी मुंबईच्या स्वाभिमानी महिला आधार उद्योग मंचाच्या वतीने दाभाडे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.

जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करून त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यास वैशाली दाभाडे यशस्वी ठरत आहेत.  हीच त्यांच्या जनसेवेची खरी पावती आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.