Talegaon News : ​राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक प्रकाशराव जोशी यांचे निधन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व संस्कार भारतीचे माजी प्रदेश सरचिटणीस प्रकाशराव​ प्रल्हाद जोशी (वय 75) यांचे आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कोरोना संसर्गामुळे निधन झाले.

प्रकाशराव जोशी यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्र सेविका समितीच्या क्षेत्र कार्यवाहिका सुनंदा जोशी यांचे ते पती तर संघ स्वयंसेवक व अभियंता मकरंद जोशी व नामवंत नृत्यांगणा मीनल कुलकर्णी यांचे ते वडील होत.

कोरोना संसर्ग झाल्यामुळे प्रकाश जोशी यांना एक महिन्यापूर्वी पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

​प्रकाश जोशी हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. अभियांत्रिकी शाखेची पदवी मिळवून त्यांनी लष्करी अभियांत्रिकी विभागात सेवा केली. त्यांनी विविध संस्था व संघटनांची जबाबदारी सांभाळली. जिल्हा व प्रांत पातळीवर काम केले. काही वर्षे त्यांनी पुण्यातील मोतीबाग कार्यालयाच्या प्रशासनाची सूत्रे सांभाळली होती. संस्कार भारती यांचे महाराष्ट्राचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले. सध्या ते संस्कार भारतीचे पश्चिम प्रांत उपाध्यक्ष होते. संस्कार भारतीच्या कामात त्यांचे मोलाचे योगदान होते.

तळेगाव दाभाडे येथील कलापिनी संस्थेचे संस्थापक सदस्य तसेच माजी अध्यक्ष होते. नाट्यक्षेत्राची त्यांनी दीर्घकाळ सेवा केली होती. तळेगावच्या श्रीरंग कला निकेतन तसेच गणेश मोफत वाचनालय या संस्थांचेही ते माजी अध्यक्ष होते. या व्यतिरिक्त अनेक संस्था व संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता. संघाचे एक उत्साही, तळमळीचे व समर्पित कार्यकर्ते म्हणून ते सर्वांना परिचित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.