Talegaon News : उपचारासाठी आलेला रुग्ण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच प्राण सोडतो तेंव्हा…

रुग्णालयातील कोरोना योद्ध्यांनीही घेतली बघ्यांची भूमिका; चार तास मृतदेह रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच

एमपीसी न्यूज – ससून रुग्णालयातून तळेगाव येथील जनरल हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण उपचारासाठी आला. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर त्याचा मृत्यू झाला. तब्बल चार तास त्याचा मृतदेह प्रवेशद्वारावर पाडून होता. दरम्यान तिथून येणाऱ्या जाणाऱ्या डॉक्टर, नर्स या एकाही कोरोना योद्ध्याला त्या मृत रुग्णाकडे बघण्यासाठी वेळ मिळाला नाही. सर्वांनीच याबाबत केवळ बघ्याची भूमिका घेतली. हा हृदयद्रावक प्रकार आज (बुधवारी, दि. 9 सप्टेंबर) घडला आहे.

वैजनाथ सिंग (वय 55) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

तळेगाव जनरल हॉस्पिटल कोविड रुग्णालय आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर बुधवारी दुपारी बारा वाजता वैजनाथ सिंग यांचा मृतदेह पडलेला होता.

हा मृत व्यक्ती अगोदर जिवंत होता. पण त्याला उपचार मिळाले नसल्याने त्याची मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

याच प्रवेशद्वारातून शेकडो नागरिक, डॉक्टर व नर्स ये -जा करत होते. प्रत्येकजण त्या मृतदेहाकडे पाहून दुःख व्यक्त करत निघून जात होता. तर रुग्णालय प्रशासनाने याकडे किंचितही लक्ष दिले नाही.

या मृतदेहाबाबत सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांना माहिती समजली असता त्यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन, डॉ. प्रवीण कानडे यांना माहिती दिली.

_MPC_DIR_MPU_II

तसेच घटनास्थळी स्व:खर्चातून पीपीई कीट देवून मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला.

या घटनेनंतर तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये माणुसकी हरवली असल्याचे नागरिक बोलत आहेत. तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर चार तास उन्हात व पावसात पडलेल्या जेष्ठ व्यक्तीच्या मृतदेहावर सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशोर आवारे, अनिल पवार, सुनिल पवार, दिलीप डोळस, गौरव खांदवे संदिप खालकर, अजित आंबेकर आदींनी यासाठी पुढाकार घेतला.

घटनास्थळी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला, किशोर गिरीगोसावी व गणेश आंबवणे यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी केले.

सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे म्हणाले, “तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये माणुसकी हरवली असून येथे धनिक रुग्णांवर उपचार केले जातात. गरीब रुग्ण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारवर मरतो. चार तास उन्हात व पावसात मृतदेह भिजत होता. त्या मृतदेहाची विटंबना होत असताना तळेगाव जनरल हॉस्पिटलने बघ्याची भूमिका घेतली.”

डॉ. प्रवीण कानडे म्हणाले, “या मृत व्यक्तीवर ससून रुग्णालय पुणे येथे उपचार झाले आहेत. त्याला लिव्हरचा आजार होता. तो उपचार घेण्यासाठी तळेगाव जनरल हॉस्पिटल येथे आला होता. मात्र, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर त्याचा मृत्यू झाला.”

 

तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक सुचित्रा नांगरे म्हणाल्या, “मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस स्टेशनला कळवले होते.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1