Talegaon News : आज आजी- माजी आमदार एकत्र येणार?

शाळांच्या फी संदर्भात तहसीलदारांनी बोलवली संयुक्त बैठक

एमपीसी न्यूज – मागील आठवड्यात मावळ तालुक्यातील खाजगी शाळांच्या फी संदर्भात आजी- माजी आमदार यांच्या मध्ये पत्रव्यवहार गाजला होता. या पार्श्वभूमीवर तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी गटविकासाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख व पालक संघटनांचे प्रतिनिधी आदींची संयुक्त बैठक वडगाव मावळ येथे बोलावली आहे.

या बैठकीस दोन्ही आमदार एकत्र येण्याची शक्यता असून या बैठकीस काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.

आमदार सुनील शेळके यांनी मागील आठवड्यात माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांना लेखी पत्राद्वारे लाॅकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पालकांना दिलासा देण्यासाठी तालुक्यातील मोठया संख्येचे अध्यक्ष म्हणून तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांचे संस्थाचालक व पदाधिका-यांशी चर्चा करून फी मध्ये सवलत मिळावी यादृष्टीने प्रयत्न करावेत अशी विनंती केली होती.

माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनीही या विनंतीला पत्राला उत्तर देत आमदार शेळके यांच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला. शाळांच्या फीमध्ये सवलत मिळावी याउद्देशाने संस्थाचालकांच्या बैठकीत पालकांना फीमध्ये सवलत देण्याबाबत निर्णय घेऊन नक्कीच मार्ग काढू; पण शासन स्तरावर आपल्या राजकीय संबंधाचा योग्य वापर करून आमदार शेळके यांनी मावळ तालुक्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्व घटकांना मदत मिळावी तसेच विना अनुदानित शैक्षणिक संस्थांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी विशेष पाठपुरावा करण्याचे आवाहनही भेगडे यांनी केले होते.

दरम्यान आमदार शेळके यांनी शाळांच्या फी संदर्भात सोमवार पर्यंत निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत कोणीही फी भरण्याची घाई गडबड करू नये असे आवाहन शेळके यांनी केले होते.

एकंदरीत आमदार शेळके व माजी राज्यमंत्री भेगडे यांच्या पत्रव्यवहाराच्या साद- प्रतिसादामुळे प्रामुख्याने पालकवर्गातून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजी- माजी मावळच्या लोकप्रतिनिधींच्या पत्रव्यवहाराच्या साद प्रतिसादानंतर मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी आज सोमवार (दि 21) वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी 3 वाजता संयुक्त बैठक बोलावली आहे.

या संयुक्त बैठकीस आमदार शेळके व माजी राज्यमंत्री भेगडे हे खरंच या खाजगी शाळांच्या फी संदर्भात या व्यासपीठावर एकत्रित येणार का? शाळांच्या फी सवलती विषयी निर्णय होणार का? हाच मावळच्या दृष्टीने औत्सुक्याचा विषय बनला असून मावळवासियांना मात्र त्यांनी एकत्रित येऊन फीबाबत योग्य निर्णय घेऊन दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे. त्यामुळे याकडे मावळवासियांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.