Talegaon News : आधुनिक जीवनशैलीतही योग उपयुक्त – डॉ. ज्योती मुंडर्गी

एमपीसी न्यूज – योग ही आपली प्राचीन परंपरा असून बदलत्या आधुनिक जीवनशैलीमध्ये देखील ती उपयुक्त व परिणामकारक आहे, असे मत ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. ज्योती मुंडर्गी यांनी व्यक्त केले.

तळेगाव दाभाडे येथील पंचवटी कॉलनीत नव्याने सुरू करण्यात आलेल्या विन्यासा योग क्लासेसचे उद्घाटन ज्येष्ठ योग प्रशिक्षक ज्योती मुंगी व ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. ज्योती मुंडर्गी यांच्या हस्ते मंगळवारी संध्याकाळी झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यावेळी विन्यासा योग क्लासेसच्या संस्थापक संचालिका सीमा इनामदार तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

डॉ. मुंडर्गी म्हणाल्या की, जिमच्या नावाखाली कृत्रिम पद्धतीने तसेच औषधांचा वापर करून मिळवलेली शरीरसंपदा दीर्घकाळ टिकत नाही. या पार्श्वभूमीवर योगसाधनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

 

विन्यासा योग क्लासेसच्या संचालिका सीमा इनामदार यांनी योगासने व प्रभावी आहार नियंत्रण करून स्वतःचे वजन 84 किलोवरून 48 किलोपर्यंत कमी करून दाखवले आहे. त्यामुळे त्यांचे अनुभवसिद्ध मार्गदर्शन अन्य महिलांसाठी खूप उपयोगी पडणार आहे, असे गौरवोद्गारही डॉ. मुंडर्गी यांनी काढले.

माणसाचे शरीर हीच त्याची खरी संपत्ती आहे. ही संपत्ती जतन करून ठेवण्यासाठी योग हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, असे ज्योती मुंगी म्हणाल्या. सीमा इनामदार

यांनी अत्यंत जिद्दीने व मेहनतीने योगाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्या आता योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी पात्र आहेत. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ सर्वांना होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विजया इनामदार यांनी ईशस्तवन म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. वैशाली इनामदार यांनी आभार प्रदर्शन केले. आकांक्षा इनामदार, स्नेहा इनामदार, समीरा इनामदार व स्मिता बारसवडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.