Talegaon News : आषाढी वारीनिमित्त तळेगावात विणेकऱ्यांचा सन्मान

एमपीसीन्यूज : श्री विठ्ठल परिवार मावळ आयोजित ‘वारी विचारांची वारी सेवेची’ या उपक्रमांतर्गत आषाढी वारी सोहळ्यानिमित्त पंढरपूर पायी वारी करणाऱ्या मावळ तालुक्यातील दिंड्यामधील विणेकऱ्यांचा सन्मान सोहळा तळेगाव दाभाडे येथील श्री विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला.

श्री विठ्ठल परिवार मावळ मागील अनेक वर्षापासून आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. “मस्तक हे पायावरी । या वारकरी संतांच्या ॥” या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या उक्तीनुसार विठ्ठल परिवार मावळ यांच्यावतीने कृतज्ञतेच्या भावनेतून विणेकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

वारकरी संप्रदायात आषाढी पायी पालखी सोहळा अत्यंत महत्वाचा समजला जातो. अनेक वर्षांची परंपरा या वारीला आहे. लाखो वारकरी या वारीत सहभागी होतात. मात्र, यंदा कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता पायी पालखी सोहळा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी वारीची परंपरा मावळ तालुक्यातील अनेक दिंड्यांनी जोपासली आहे.

विठ्ठल परिवार मावळ यांच्यावतीने विणेकऱ्यांना संपूर्ण वारकरी पोशाख व जीवनावश्यक किट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी मावळमधील कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन प्रवचन, भारूड याद्वारे ज्यांनी प्रबोधनारुपी सेवा केली.

यामध्ये गोपीचंद कचरे, अनिल सावळे, संतोष मालपोटे, किसन केदारी, सचिन शिंदे, सोमनाथ साठे, सागर भदे, काजल भेगडे, रुपाली नाणेकर यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

वारीची परंपरा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. विणेकऱ्यांनी जपलेली आदर्श परंपरा, पांडुरंगाप्रती असलेली भक्ती, समाजाप्रती जपलेला सेवाभाव यातून उतराई होण्यासाठी विणेकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याचे अध्यक्ष हभप गणेश महाराज जांभळे यांनी सांगितले.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, ज्येष्ठ मार्गदर्शक शंकरराव शेळके, विश्वस्त सुरेशभाई शहा, बाळासाहेब आरडे, हभप ज्ञानेश्वर महाराज दाभाडे, तालुका दिंडी समाज अध्यक्ष नरहरी केदारी, अखिल भारतीय वारकरी मंडळ पुणे जिल्हाध्यक्ष सुखदेव ठाकर, अखिल वारकरी संघ सचिव प्रभाकर टेमगिरे, मधुकर शेळके तसेच विठ्ठल परिवार पदाधिकारी, सदस्य, इतर मान्यवर उपस्थित होते.

विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष बाळा भेगडे यांनी तळेगाव दाभाडे येथील श्री विठ्ठल मंदिराचा इतिहास, विठ्ठल परिवार मावळ यांच्या कार्याविषयी कौतुक मनोगतातून व्यक्त केले.

प्रास्ताविक हभप नितीन महाराज काकडे यांनी केले. सूत्रसंचालन हभप दिलीप महाराज खेंगरे यांनी केले. आभार हभप नथुराम (पाटीलबुवा) जगताप यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.