Talegaon News : मावळ बंद नेमका कोणासाठी ; सचिन घोटकुले यांचा सवाल

एमपीसीन्यूज : सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत दडपशाही सुरू झाल्याचा चुकीचा आरोप करत भारतीय जनता पक्षाने मावळ बंदची हाक दिली असून मावळ बंद हा नेमका कोणासाठी केला आहे, अशी विचारणा पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी केली आहे.

भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब नेवाळे यांनी गोवित्री विविध कार्यकारी सोसायटीत गैरकारभार केल्याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यामध्ये दोन दिवसापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवाळे यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नेवाळे यांना अटक केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी मीडियासमोर येत मावळ बंदची हाक दिली आहे.

मीडियासमोर येताच जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी महाविकास आघाडी सत्तेचा गैरवापर करत असल्याचा चुकीचा आरोप केला आहे. प्रत्यक्षात यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप राष्ट्रवादीकडून करण्यात आलेला नाही.भाजपचे आरोप बिनबुडाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी सत्तेचा गैरवापर करत नसून भारतीय जनता पार्टीच यामध्ये माहीर आहे, असा पलटवार युवक अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी केला.

कोरोना काळात अनेक युवकांनी आपले रोजगार गमावले, त्याचा प्रभाव आजही संपलेला नाही. या काळामध्ये युवकांना रोजगाराची व भरीव आधाराची गरज असताना मावळ बंद सारख्या गोष्टी करून युवकांना भरकटवन्याचे काम भाजपचे जिल्हाध्यक्ष करत आहे. कोरोनानंतर विस्कटलेली घडी बसवण्यात मावळातील सर्वसामान्य नागरीक झटत असताना केवळ राजकीय स्वार्थापोटी व पक्षातील एका नेत्यासाठी मावळ बंदची हाक देणे चुकीचे आहे, असेही घोटकुले म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.