Talegaon News : तळेगावात ‘जनसेवा थाळी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसीन्यूज : राज्य शासनाने बुधवार (दि.14) पासून दि.1 मेपर्यंत लॉकडाऊन सुरु केला आहे. त्यामुळे गरीब व गरजू रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे येथील मराठा क्रांती चौकात 5 रुपयात जनसेवा थाळीचा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दिवसाला 200 गरीब व गरजू लाभार्थी या जनसेवा थाळीचा लाभ घेत आहेत. या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.  सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती या उपक्रमाला मदतीचा हात देत आहेत.

जनसेवा थाळी केवळ 5 रुपयात उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनाही मोफत जेवण दिले जात आहे. दुपारी 12.30 ते 2.30 वा. या कालावधीत ही थाळी मिळते. परिसरातील गरीब व गरजू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून ही थाळी घेण्यासाठी रांगा लावतात.

थाळीचे नियोजन अनिल कारके व श्याम मोहिते करत असून भुकेलेल्यांना अन्न मिळाल्याने त्यांचे डोळे पाणावलेले पहायला मिळतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.