Talegaon : शिव गानची उत्तर दिग्विजय मोहीम फत्ते…!

एमपीसी न्यूज ( क्षिप्रसाधन भरड) –  छत्रपती शिवाजी महाराजांच्या  ( Talegaon) आचाराची, विचारांची आज खऱ्या अर्थाने समाजाला गरज असून, महाराजांचा इतिहास वारंवार सांगणे, ऐकणे आणि अनुभवणे महत्त्वाचे आहे. महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी स्थापन न करता, रयतेचे राज्य व्हावे, यासाठी राजे कायम दक्ष असत.

महिला सुरक्षा, शेतकरी विमा तसेच मोफत बियाणे वाटप, शेत मालाला योग्य मोबदला, पाटबंधारे, लोकहितवादी कायदे, न्याय्य कर प्रणाली, गुन्हेगारांना कडक शासन, भ्रष्टाचार विरहित राज्य कारभार, सज्ज सुरक्षा यंत्रणा, काळानुरूप अद्ययावत आरमार, वाड्या वस्त्यांपर्यंत पाणी पुरवठ्यासाठी जलसंधारण, स्वदेशी मालाला उठाव मिळण्यासाठी विदेशी मालावर जास्त कर, दुष्काळ ग्रस्त भागांना नुकसान भरपाई, धर्म जीर्णोद्धारासाठी मंदिरांची पुनर्स्थापना, मंदिर, मठांना आर्थिक सहाय्य व सुरक्षा, तसेच धर्मांतरण केलेल्यांची घरवापासी, स्वजनांना त्रास देणाऱ्या इतर धर्मातील प्रचारकांचा मुलाहिजा न ठेवता शिक्षा, राष्ट्राचे स्वत्व जपण्यासाठी स्वभाषेतून राज्य कारभार, अत्यंत दूरदृष्टीने केलेली बांधकामे, प्रगल्भ हेर खाते, या आणि अशा अनेक बाबी, ज्या आजच्या काळातही स्वप्नवत वाटतात, त्या साऱ्या महाराजांनी जवळपास साडेतीनशे वर्ष आधीच अंमलात आणून दाखवल्या होत्या. संपूर्ण परकीय सत्ता असताना. यांसारख्या असंख्य गुणांमुळे महाराजांची महत्ता अधोरेखित होते.
आणि म्हणूनच, महाराजांची महती पुढच्या पिढ्यांपर्यंत सातत्याने ऐकवली जाणं का गरजेचं आहे, हे लक्षात येतं.

‘ बहुधाप्येकं समाराधनम्|’ या श्लोकाला अनुसरून, रसिकांच्या आवडत्या कलेच्या माध्यमातून शिवचरित्र सातत्याने येत राहणं गरजेचं आहे.
बहुदा, हाच विचार घेऊन, मावळातील श्रीरंग कला निकेतनच्या मावळ्यांनी, कलाकारांनी कंबर कसली, आणि शिवपुर्व काळ ते शिवराज्याभिषेक हा संपूर्ण इतिहास गीत, संगीत, नृत्य, नाट्य, कथाकथन, निवेदन यांद्वारे रंगमंचावर साक्षात जिवंत केला आणि
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिव गान या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग महाराष्ट्र दिनीच सादर केला गेला.

Pune : शहरात अवजड वाहनांना बंदी; वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल

तब्बल 25 कलाकारांच्या या संचाने इथेच न थांबता, 2024ची शिवजयंती चक्क झांसी आणि कानपूर येथे शिव गान सादर करत उत्तर दिग्विजय मोहीम फत्ते केली.श्रीरंग कला निकेतन चे उपाध्यक्ष आणि तळेगावातील सुप्रसिद्ध कलाकार   ( Talegaon) राजीव कुमठेकर यांच्या संकल्पनेतून आणि दिग्दर्शनातून साकारलेल्या शिव गान ची सारीच अंग अत्यंत रेखीव व सुबक झाली आहेत.

ज्येष्ठ पेटीवादक  प्रदीप जोशी यांचे अनुभवी पेटी वादन,  राजेश झिरपे यांची सिंथेसायझर वर फिरणारी जादुई बोटे,  सचिन इंगळे महाराज यांच्या मृदुंगाचा कडक आवाज,   अनिरुद्ध जोशी यांची सुयोग्य तबला साथ,  प्रवीण ढवळे यांची एकाच वेळी अनेक वाद्यांवरची करामत आणि अत्यंत कमी वयात चि. गंधार ढवळेची ताल वाद्यांवरची हुकूमत;  संगीताची ही बाजू जितकी भक्कम, तितकेच राजीव कुमठेकर यांचे उमदे गायन, सम्राट काशीकर यांचे पहाडी आवाजातील स्वर,   वरदा मातापूरकर यांचे भावपूर्ण सुश्राव्य गायन, कु. धनश्री शिंदे यांचे रियाजाने कसलेली रागदारी आणि डॉ . प्राची पांडे यांचे काळजाला हात घालणारे आर्त स्वर व या साऱ्यांना उचलून धरणारी  तरुण मातापूरकर यांची आश्वासक स्वर साथ.  या साऱ्यांच्या अथक परिश्रमातून शिव गानची सारीच गीते एकाहून एक सरस झाली आहेत.

चि. अगस्त्य भरड या चिमुरड्याच्या अदाकारितून मूर्तिमंत बाल शिवाजीचं दर्शन घडतं.  गुणी बाळ असा, जागसी का रे वाया, या गीतातून त्याने दाखवलेली बाल शिवाजींची आपल्या लोकांप्रती असलेली तगमग वाखाणण्या जोगी. त्याला तितकीच समर्पक साथ मिळते  मीरा भरड यांची. त्यांच्या इतर दोन्ही नृत्यातील सात्विक व कायिक मुद्रा अत्यंत भावपूर्ण ठरतात. बाजीप्रभू साकारताना त्यांनी केलेला भावोत्कट अभिनय आणि डॉ.   प्राची पांडे यांच्या स्वराने रसिकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात.

डॉ.   मीनल कुलकर्णी यांच्या समूह नृत्याने अनेक ऐतिहासिक प्रसंग मंचावर दृश्यमान होतात. गीतांच्या शब्दांवर आणि त्या शब्दांमागच्या भावनांवर त्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या प्रत्येक मुद्रे मधून दिसून येते. त्यांच्या शिष्या कु. समा भावसार, मैत्रेयी कोल्हापुरे, चीत्रांगी राजे, यशदा जोशी, क्षितिजा बवले या आपल्या नृत्यातून आपल्या गुरूंचा विश्वास सार्थ ठरवतात. कवी भूषणाच्या गीतांवर डॉ.   मीनल कुलकर्णी आणि त्यांच्या शिष्यांनी सादर केलेली नृत्ये, अलंकारिक पद्धतीने थेट रणांगणावर घेऊन जातात.

 

राजीव कुमठेकर यांनी वठवलेला क्रूरकर्मा, मुरब्बी, कवडीचुंबक औरंगझेब छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेंव्हा बोलतो, तेंव्हा शत्रूच्या मनात सुद्धा महाराजांच्या प्रती असलेला आदर, महाराजांची स्वच्छ चारित्र्याची प्रतिमा   ( Talegaon) आणि आचार – विचार – शौर्य – कल्पकता – बुद्धिमत्ता यांची छबी आपल्यासमोर आणखीनच उजळून येते.डॉ.  मीनल कुलकर्णी यांच्या राणी लक्ष्मीबाई महाराजांचे कार्य, स्वराज्य, सुशासन, शत्रूला शरण न जाता दाखवलेली मर्दुमकीची ज्योत, प्रेक्षकांच्या मनात प्रकाशमान होत राहते. क्षिप्रसाधन भरड यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाने, भाषेवरील प्रभुत्वाने, ऐतिहासिक प्रसंग कधी अंगावर येत, कधी डोळ्यात टचकन पाणी आणत, या साऱ्या पुष्पांना एकत्रित पणे घट्ट विणून ठेवतात.

झांशी येथील ऐतिहासिक गणपती मंदिरात, तेथील महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या शिव गान ला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले.तदपश्र्चात, यंदाची शिवजयंती कानपूर येथील, शतक महोत्सव साजरा करणाऱ्या महाराष्ट्र मंडळातही शिव गान सादर झाले. कलाकारांनी अत्यंत निष्ठेने सादर केलेल्या कलेने मंत्रमुग्ध झालेल्या रसिकांनी, शिव गान चे प्रयोग हे कोणत्याही महानाट्यापेक्षा कुठेही कमी नसून, गावागावात, शहरा शहरात याचे प्रयोग व्हावेत व महाराजांचे गुणगान असेच सदोदित होत राहावे, अशी भावना व्यक्त केली.

घरापासून शेकडो मैल दूर जाऊन आपल्या महाराजांची कीर्ती मोठ्या तडफेने गाणाऱ्या तळेगांवच्या श्रीरंग कला निकेतनच्या कलाकारांचे अत्यंत आत्मीयतेने स्वागत करून, उत्कृष्ट आयोजनाचा परिपाठ  पीयूष मातापुरकर यांनी घालून दिला.सवयीच्या विषम हवामानात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रवास करत, केवळ महाराजांवरील निष्ठा आणि रसिकांच्या प्रतिसादामुळे, श्रीरंगच्या कलाकारांची ही उत्तर दिग्विजय मोहीम फत्ते केली.

विविध ठिकाणचे आयोजक यापुढेही शिव गान चे कार्यक्रम आयोजित करीत राहतीलच, आणि महाराजांचे हे कलोत्कट मावळे ते सादर करत राहतीलच… पण आता खरी गरज आहे, ती फक्त घराघरातल्या जिजाऊंनी स्वतःला स्वतःची ओळख करून देत, आपापल्या घरातल्या बाळराजांना या कार्यक्रम स्थळापर्यंत घेऊन  ( Talegaon) येण्याची.

जय जिजाऊ, जय शिवराय!   ….  हर हर… महादेव!

लेखक – क्षिप्रसाधन भरड

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.