Talegaon : शस्त्राचा धाक दाखवून सव्वा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – शस्त्राचा धाक दाखवून आठ ते नऊ तरुणांनी एक लाख 30 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना जिजामाता चौक तळेगाव येथे 5 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. फिर्यादींनी गुरुवारी (दि. 15) तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वनाथ भगवान भेगडे (वय 44, रा. शुक्रवार पेठ, तळेगाव) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आठ ते नऊ तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव मधील जिजामाता चौकात जिजामाता मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये फिर्यादी विश्वनाथ आणि त्यांचे मित्र विनोद भेगडे, बाळासाहेब शेंडगे, संतोष भेगडे हे चौघेजण चर्चा करीत बसले होते. दरम्यान अचानक आठ ते नऊ तरुण (वय अंदाजे 22 ते 25) पत्र्याच्या शेडमध्ये आले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना पिस्तुल आणि लोखंडी कोयत्याचा धाक दाखवला. फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांजवळ असलेला एक लाख तीस हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत विश्वनाथ यांनी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.