Talegaon : सोमाटणे फाट्यावर सेंट्रिंग मटेरियल चोरणा-यास पिंपरी पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – सोमाटणे फाटा येथे घरफोडी करून सेंट्रिंग मटेरियल चोरून नेणा-या एकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दिलीप बजरंग पवार (वय 22, रा. अजमेरा, पिंपरी. मूळ रा. लालटोपीनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याचा साथीदार सुनील देशमुख (रा. नांदेड) हा फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे फाट्याजवळ शिंदे वस्ती येथे गोडाऊनमध्ये ठेवलेल्या 72 सेंट्रिक प्लेट, एक कटर मशीन, पाच किलो बाइंडिंग वायर, दोन फावडे आणि दोन घमेले असे एकूण 45 हजार 600 रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 11 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत विलास राघोबा पुंडे (वय 55, रा. भोसरी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

15 फेब्रुवारी रोजी पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक व्हावळ आणि पोलीस शिपाई घाडगे यांना माहिती मिळाली की, महेशनगर चापतींकडून जुन्या पुण-मुंबई महामार्गाकडे जाणा-या रस्त्यावर डी. वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर एक टेम्पो थांबला आहे. त्यामध्ये चोरीच्या सेंट्रिंग प्लेट आहेत.

पिंपरी पोलिसांनी माहितीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता टेम्पोजवळ थांबलेला एक इसम पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी ताब्यात घेतले आणि टेम्पोत असलेल्या सेंट्रिंग प्लेट आणि इतर साहित्याबाबत चौकशी केली असता त्याने आणि त्याचा साथीदार सुनील देशमुख या दोघांनी सोमाटणे फाटा येथे चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी दिलीप पवार याला अटक करून पुढील तपासासाठी तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

दिलीप पवार यांच्याकडून 72 सेंट्रिक प्लेट, एक कटर मशीन, पाच किलो बाइंडिंग वायर, एक फावडे आणि टेम्पो असा एकूण 2 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.