Talegaon Post Office News : दोन पोस्ट ऑफिसचा कारभार एकाच ठिकाणाहून; कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे ( Talegaon  Dabhade) येथे गाव विभाग आणि स्टेशन विभाग अशी दोन पोस्ट कार्यालये ( Post Office ) एकाच ठिकाणी आणण्यात आली आहेत. या दोन्ही पोस्ट ऑफिसचा कारभार एकाच ठिकाणाहून चालत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराला (social distance) हरताळ फासला जात आहे. तळेगाव स्टेशन भागातील पोस्ट ऑफिस तात्काळ स्टेशन भागात सुरु करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

तळेगाव दाभाडे गाव विभाग व तळेगाव स्टेशन विभाग या मधील दोन पोस्ट ऑफिस एकाच ठिकाणी काम करत असल्याने पोस्टाशी संबंधित कामे करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना त्याचा मानसिक त्रास होत असून यामध्ये शासनाच्या नियमानुसार सुरक्षित अंतर ठेवण्याचा फज्जा उडालेला दिसत आहे.

तळेगाव स्टेशनचे पोस्ट ऑफिस लवकरात लवकर विभक्त करून ते तळेगाव स्टेशनच्या भागामध्ये सुरु करावे, अशी मागणी तळेगाव स्टेशन व ग्रामीण भागातील खातेदारांकडून होत आहे.

मागील वर्षी तळेगाव स्टेशन येथील पोस्ट ऑफिस अनधिकृत जागेत असल्याने तळेगाव दाभाडे नगरपरिषदकडून कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे तळेगाव स्टेशन भागातलं पोस्ट ऑफिस गावातील शाळा चौक येथे सुरु आहे.

या पोस्ट ऑफिस मध्ये तळेगाव (गाव भाग) तळेगाव स्टेशन भागातील आंबी, नवलाख उंब्रे,निगडे, आंबळे, मंगरूळ, गोळेवाडी नाणोली, वराळे, वारंगवाडीसह आधी गावाचा सहभाग आहे. या गावातील नागरिकांना पोस्टातील कामे करण्यासाठी येथे येण्यासाठी नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

या कामामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आपल्या ठेवीवरील व्याज घेणे, आपल्या बचत खात्यावरील रक्कम काढणे तसेच रजिस्टरच्या माध्यमातून बुकींग करणे, स्पीड पोस्ट करणे,अनामत ठेव ठेवणे, निवृत्त कामगारांचे पगार घेणे, दैनंदिन बचतीची रक्कम जमा करणे गोष्टी रजिस्टर तपासणे, त्याचे वाटप करणे, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे आदी महत्त्वाची कामे केली जातात.

परंतु, या ठिकाणी एका खोलीत दोन खिडक्यांद्वारे ही कामे केली जात असल्याने अपु-या जागेमुळे दोन रांगा ही व्यवस्थित होत नाहीत. यामध्ये तळेगाव गाव भागाची व स्टेशन भागाची नेमकी रांग कोणती याबाबत संभ्रम निर्माण होऊन वेळ व श्रम वाया जाऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सामाजिक अंतर पाळले जात नसल्याने कोरोना ( corona ) संक्रमणाची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.