Talegaon : विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या प्रसादची मृत्यूशी झुंज अपयशी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील खाऊ गल्लीमध्ये पावभाजीचा व्यवसाय करणारा तरुण विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल 13 दिवस मृत्यूशी झुंज देत होता. अखेर तो यात अपयशी ठरला अन् बुधवारी (दि. 12) उपचारादरम्यान रुग्णालयात त्याची प्राणज्योत मळवली. अवघा दोन दिवसांचा संसार करून त्याने जगाचा निरोप घेतला.

प्रसाद उर्फ सोन्या जाधव (वय 28) असे मृत्यू झालेल्या युवा उद्योजकाचे नाव आहे.

  • प्रसादाचे 29 मे रोजी लग्न झाले. लग्नानंतर दोन दिवसांनी त्याने स्वतःच्या लग्नानिमित्त पूजा व स्वागताचा कार्यक्रम 31 मे रोजी आयोजित केला होता. त्याच दिवशी काळाने घात घातला. पूजेच्या वेळी प्रसाद हा घराजवळ असलेल्या विजेच्या खांबावर अडकलेला बॅनर काढण्यासाठी प्रसाद खांबावर चढला.

बॅनर काढत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. तो 40 फूट उंचीवरून खाली डांबरी रस्त्यावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला. 60 टक्क्यांहून अधिक भाजला. त्याला तात्काळ उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • त्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्याच्या उपचाराचा खर्च त्याच्या घरच्यांना पेलवणारा नव्हता. त्यामुळे त्याच्यावरील उपचारासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. सोशल मीडिया आणि मित्र परिवाराकडून त्याला मोठ्या प्रमाणात मदतही मिळाली. पण, नियतीला ही मान्य नसल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, आई, वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

प्रसादने तळेगाव आणि स्टेशन परिसरातील आपल्या हातची स्वादिष्ट पावभाजी ग्राहकांना खाऊ घालून खाऊ गल्लीमध्ये आपलं एक स्थान निर्माण केलं होतं. त्याचा अपघात झाल्यानंतर त्याचा मित्र परिवार सतत त्याच्या सोबत होता. त्याच्या जाण्याने खाऊ गल्ली आणि तळेगाव स्टेशन परिसरावर शोककळा पसरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.