Talegaon : प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या ‘तू म्हणशील तसं!’ नाटकाला कलापिनी तळेगावकर रसिकांचा भरभरून प्रतिसाद

एमपीसी न्यूज- गौरी थिएटर निर्मित, पुणे टॉकिज प्रस्तुत (Talegaon ) आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनचा “तू म्हणशील तसं!” ह्या नाटकाचा प्रयोग कलापिनी सांस्कृतिक केंद्रात, कै. डॉ. शं. वां. परांजपे नाट्यसंकुल येथे प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला. कलापिनी कलामंडळ प्रेक्षक चळवळीचा शुभारंभ अतिशय उत्साही वातावरणात झाला.

रोजच्या दैनंदिन आयुष्यात नवरा बायकोचे लहान सहान कारणांवरून उडणारे खटके, एकाच ठिकाणी, एकाच क्षेत्रात कामाला असल्यामुळे त्यातून निर्माण होणारे तिढे, गैरसमज आणि गंमती- जमती हलक्या फुलक्या स्वरुपात दाखविल्या होत्या. अगदी रोजच्या आयुष्याशी निगडीत असे प्रसंग आणि विनोद बघताना रसिक प्रेक्षक हशा आणि टाळ्यामध्ये रंगून गेले.

दोन अंकी नाटकात, दोन प्रवेशांच्या मध्ये, एकदाही ब्लॅकआऊट न होता नाविन्यपूर्ण पद्धतीने बदलणारे नेपथ्य लक्षवेधक होते. कारण थोडा जरी विश्राम मिळाला की लगेच लोकं मोबाईल मध्ये डोकावतात. त्यावर पर्याय म्हणून ब्लॅकआऊट न करता प्रकाशातच पडद्यामागचे कलाकार एका ठरलेल्या संगीतावर आणि सारख्या पोशाखात नेपथ्यात बदल करत होते.

या नाटकाचे दिग्दर्शन अभिनेते प्रसाद ओक यांनी केले आहे. लेखन संकर्षण कऱ्हाडे यांनी केले असून प्रमुख भूमिकाही त्यांनी साकारली आहे. विनोदाचे  अचूक टायमिंग, समयसुचकता, तुफान ऊर्जेने रंगमंचावरचा वावर, अभिनयातील सहजता या सगळ्याच गोष्टींमुळे त्यांची भूमिका रंगली. त्याचबरोबर काजल काटे, अमोल कुलकर्णी आणि प्रिया करमरकर या कलाकारांनी देखील त्यांना उत्तम साथ देऊन रसिकांचे भरभरून मनोरंजन केले. साजेशी प्रकाशयोजना आणि पूरक संगीत यामुळे नाटक एका वेगळ्या उंचीला जाते.

Pune : कलागुणांमुळे दिव्यांगही ठरतात समाजातील हिरे-भूषण गोखले

नाटकाच्या मध्यंतरात सर्व कलाकारांचा कलापिनीच्या वतीने सत्कार केला. यावेळी संकर्षण कऱ्हाडे म्हणाले, “कलापिनी संस्थेबद्दल बरच ऐकून होतो आणि आज प्रयोग करताना खूप आनंद होतोय. प्रशांत दामले यांचा मला फोन आला होता की, कलापिनीचे रसिक जाणकार आहेत. प्रयोग उत्तम करा. कलापिनीशी जुळलेले ऋणानुबंध असेच राहतील.”

कलापिनी कला मंडळ प्रमुख चेतन शहा म्हणाले, “उत्तमोत्तम प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके कलापिनी कलामंडळ सदस्यांना दाखविण्याचा मानस आहे.”

यावेळी प्रतीक मेहता, कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे, अध्यक्ष विनायक अभ्यंकर, उपाध्यक्ष अशोक बकरे, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, डॉ मीनल कुलकर्णी, संजय मालकर, विनायक भालेराव आदी मान्यवर (Talegaon ) उपस्थित होते. अभिलाष भवार, स्वच्छंद, विनायक काळे, प्रिती शिंदे, राकेश परदेशी, अनघा बुरसे, रश्मी पांढरे, चैतन्य जोशी, विराज सवाई, श्रीपाद बुरसे, रामचंद्र रानडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.