Talegaon : परराज्यातील कामगार, नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी रांगा

एमपीसी न्यूज : तळेगाव शहर परिसरात लॉकडाऊनमध्ये अनके परप्रांतीय कामगार आणि नागरिक अडकवून पडले आहेत. त्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र गरजेचे आहे. त्यासाठी या कामगार आणि नागरिकांची आरोग्य तपासणी तळेगाव जनरल रुग्णालयात सुरु करण्यात आली असून त्यासाठी मोठ्याप्रमाणात रांगा लागत आहेत.

तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तळेगाव दाभाडे नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही आरोग्य तपासणी सुविधा डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालय आणि मायमर मेडिकल कॉलेज येथे करण्यात येत आहे. डॉ. दिलीप भोगे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके तपासणी करत आहेत.

तळेगाव परिसरामध्ये विविध औद्योगिक कंपन्या, बांधकामावर काम करणारे मजूर, तसेच रस्त्यावर काम करणारे मजूर तसेच अन्य परप्रांतीय व्यावसायिकांचा या आरोग्य तपासणीच्या कामात सहभाग आहे. यामध्ये तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल आदि राज्यात जाणा-या मजुरांचा व नागरिकांचा समावेश आहे.

कोरोनामुळे गेली दोन महिने हे सर्वजण लॉकडाऊनमध्ये अडकले होते. शासनाने त्यांना आपापल्या घरी जाण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे त्यांना आपापल्या गावी जाण्याची ओढ लागल्यामुळे हे सर्वजण घरी जाण्यासाठी लागणारी तपासणीची प्रक्रिया पूर्ण करीत आहेत.

सकाळी दहा वाजता हि आरोग्य तपासणी सुरु होऊन सायंकाळी ५ वाजता संपते. तपासणी केल्यानंतर त्यांना आरोग्य प्रमाणपत्र लागलीच दिले जाते, असे डॉ. दिलीप भोगे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी सांगितले.

या तपासणीच्या ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी दीपक झिंजाड, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे आदींनी या तपासणी कामात सुसूत्रता व शांतता राखण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. अश्याच प्रकारची तपासणी करण्याची व्यवस्था इतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्रावर करण्यात आल्याचे डॉ. कानडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.