Talegaon : रमजान ईदची नमाज प्रथमच घराघरात अदा; मुस्लिम महिलांना विशेष आनंद

एमपीसीन्यूज – कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या कायदेशीर नियमांचे पालन करत मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील मुस्लिम कुटुंबीयांनी आज सोमवारी घरोघरी रमजान ईद आनंदात साजरी केली.

दरवर्षी ईदगाह किंवा मशिदींमध्ये पुरुष मंडळी व लहान मुली ईदची नमाज मोठ्या संख्येने सहभागी होत अदा करतात. मात्र, यंदा घरात प्रथमच कुटुंबातील सर्वांनी एकत्र मिळून नमाज, खुतबा(प्रवचन), दुआ केल्याने कौटुंबिक आनंदाचा अनोखा अनुभव घेतला, असे मुस्लिम यंग सर्कलचे इम्रान आलमेल आणि यांनी सांगितले.

मोबाईल-इंटरनेटचा जमाना असल्याने मुस्लिम कुटुंबीयांनी व्हिडीओ कॉल आणि इतर app वापरून नातेवाईक, मित्रमंडळी आणि आप्तेष्टांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या.

यंदा प्रथमच संपूर्ण रमजान महिन्यातील सेहरी, रोजा इफ्तारी, तराबी, बडी रात, चंद्रदर्शन आणि ईदच्या दिवशी नमाज पठण हे कुटुंबातील महिला आणि आबालवृद्धांच्या सोबत राहून करता आले. गेल्या साडे चौदाशे वर्षात अशी ईद साजरी करण्याचा हा प्रसंग पहिल्यांदाच आला असल्याचे मुस्लिम मराठी संघाचे सचिव बालम शेख यांनी सांगितले.

यंदा मित्रमंडळींच्या सोबत ईद साजरी करता येत नसली तरी लॉकडाऊन नंतर ती साजरी होईलच, असे जलालखान आलमेल यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.