Talegaon : दाभाडे सरकारच्या मिळकतींवर नावे लावा; श्रीमंत दाभाडे सरकारचे जिल्हाधिका-यांना निवेदन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे श्रीमंत सरदार दाभाडे सरकार यांच्या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण व पुनर्वसन झाले आहे. हे अतिक्रमण व पुनर्वसन प्रशासनाने तात्काळ हटवावे. तसेच संबंधित जागेची मोजणी करून ती जागा श्रीमंत सरदार दाभाडे सरकार घराण्याला हस्तांतरित करावी. तसेच त्यावर श्रीमंत दाभाडे सरकार घराण्याचे नाव लावावे, अशी मागणी श्रीमंत सरदार दाभाडे सरकार यांनी जिल्हाधिका-यांकडे केली.

श्रीमंत सरदार चंद्रसेनराजे विजयसिंहराजे दाभाडे सरकार, वृषालीराजे, पद्मसेनराजे दाभाडे सरकार, श्रीमंत सरदार सत्यशीलराजे पद्मसेनराजे दाभाडे सरकार यांनी याबाबत जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, “श्रीमंत सरदार दाभाडे सरकार यांच्या तळेगाव स्टेशन येथील गट क्रमांक 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35 या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण व पुनर्वसन झाले आहे. त्यावर प्रशासनाने रोख लावावी. तळेगाव दाभाडे व आसपासच्या परिसरातील अनेक मिळकती दाभाडे घराण्याला इनाम म्हणून मिळाल्या आहेत. पण वरील जमीन दाभाडे घराण्याची पूर्वीपासूनची आहे. या जमिनीचे कोणत्याही प्रकारचे वाटप किंवा फाळणी झालेली नाही. 1923 साली गट क्रमांक 30 मधील काही जमीन रेल्वेला मुरूम काढण्यासाठी देण्यात आली. मात्र अनेक वर्षानंतर देखील रेल्वेने त्याचा उपयोग केला नाही. त्यामुळे 1947 साली जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार या जमिनीचे रेल्वे खाणीकडील नाव कमी करून सरकारी बीन आकारी पड असे नामकरण झाले, ती जमीन दाभाडे घराण्यास परत द्यावी.

मात्र त्यावेळी श्रीमंत सरदार दाभाडे यांचे नाव त्या जमिनीच्या कागदपत्रांवर लावण्याचे राहून गेले. ती जमीन दाभाडे घराण्याची आहे. त्यामुळे त्या जमिनीवर सध्या होणारे अतिक्रमण आणि गृहप्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी. तसेच 2000 साली शासनाने सरदार दाभाडे सरकार यांचे नाव लावतो किंवा लावावे याकरिता प्रयत्न केले होते. नजरचुकीने ते नाव लावायचे राहिले आहे. सदरच्या सर्व गटांमध्ये इतर कुणाचाही काहीएक संबंध नसून ही सदरची जागा सरदार दाभाडे घराण्याची आहे. तसेच लवकरात लवकर भूमी अभिलेख अधीक्षक उपअधीक्षक यांना सांगून त्या सर्व गटाची मोजणी करून ती जागा दाभाडे घराण्याला हस्तांतरीत करावी. तळेगाव दाभाडे नगरपरीषदेने या जागेसंदर्भात कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करू नये.

मागील आठवड्यात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने अतिक्रमणांवर कारवाई केली आहे. त्यामुळे तळेगाव स्टेशन जवळील दाभाडे घराण्याची जागा अतिक्रमण मुक्त झाली आहे. त्या जागेवर आता कोणत्याही व्यावसायिक अथवा नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये, याबाबतची नोटीस लावावी. दाभाडे घराण्याचे नाव संबंधित जमिनीच्या सात बारावर नोंद करावे, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.