Talegaon : अपेक्षित प्रवासी नसल्याने रिक्षा व्यवसाय संकटात; शासकीय मदतीची मागणी

Rickshaw business in crisis due to lack of expected passengers; Seeking government help

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीची झळ रिक्षाचालकांना चांगलीच बसली असून त्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली. अनेक ठिकाणी उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहेत. शासनाने प्रवासी वाहनांना काही नियम व अटींना अधीन राहून परवानगी दिली आहे. मात्र, तळेगाव शहर परिसरात रिक्षांसाठी अपेक्षित प्रवासीच नसल्याने अनेक रिक्षांची चाके जागेवरच थांबली आहेत.

नियमानुसार रिक्षात दोन प्रवाशांना परवानगी आहे. मात्र, भाडे परवडत नाही. त्यामुळे रिक्षाचालकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रिक्षाचालक राज्य शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

तळेगाव आणि स्टेशन परिसरातील प्रमुख रस्त्यांवर शेकडोंच्या संख्येने परवानाधारक रिक्षाचालक प्रवाशांची वाहतूक करत आहेत.

यातील अनेकांनी बँक वा फायनान्स कंपनीचे कर्ज काढून रिक्षा घेतल्या आहेत.काहींनी घरातील दाग दागिने गहाण ठेवून, मित्र मंडळी अथवा नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेऊन रिक्षा खरेदी केल्या आहेत.

तळेगाव परिसरातील शाळा,महाविद्यालय, कंपन्या तसेच महामार्गावरील रस्त्यांवर प्रवाशांची वाहतूक करून हे रिक्षा चालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.

कोरोनाच्या संकटामुळे लोकडाऊन घोषित करण्यात आल्याने जवळपास तीन महिने रिक्षावाहतूक बंद होती. यामुळे रिक्षा चालकांचे खूपच हाल झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली.

अगोदरच बँकांचे कर्जाचे हप्ते भरणे मुश्किल असताना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होऊन बसले आहे. राज्य सरकारने काही नियमांमध्ये राहून रिक्षाचालकांना प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, रस्त्यावर प्रवासी कमी असल्याने कुटुंबाची उपजीविका करणे शक्य होत नाही.

याशिवाय दोन प्रवाशांवर रिक्षाचे भाडे परवडत नाही. कमी दरात जायचे म्हटले तर रिक्षाचालकांना ते परवडत नाही. त्यातच बँका व फायनान्स कंपन्यांकडून सतत फोन करून कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावला जातो आहे.

यामुळे रिक्षा चालक अक्षरशः हवालदिल झाले आहेत. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केले असले तरी म्हणावा तेवढा धंदा होत नाही. मुलांच्या शाळा सुरू झाल्यावर शाळांचा खर्च कुठून करायचा ?, असा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे.

कोरोनामुळे जवळपास गेली तीन महिने रिक्षा बंद आहेत. बँकेचे कर्ज काढून रिक्षा घेतल्या आहेत. मात्र रिक्षा बंद असल्याने कर्जाचे वेळेत हप्ते भरणे अवघड झाले आहे. शासनाने हप्ते भरण्यास सवलत दिली आहे. मात्र, बँकेकडून हप्ते वसुलीसाठी सतत फोन येत आहेत.

रिक्षा चालकांसाठी सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोळस यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like