Talegaon : नद्यांची पाणीपातळी वाढली; तळेगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – इंद्रायणी आणि पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. ट्रान्सफॉर्मर व जॅकवेल पाण्याखाली गेले. सोमाटणे व इंद्रायणी पंपिंग स्टेशन बंद ठेवले असल्याने तळेगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

मावळ तालुक्यात पावसाने थैमान घातले असून पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. तळेगाव शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीवरील सोमटणे पंप हाऊस येथील ट्रान्सफॉर्मर व जॅकवेल पाण्याखाली गेला आहे. येथील पाणी पुरवठा योजनाच पाण्याखाली गेल्याने सोमवार (दि. 5) पासून तळेगाव शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असल्याने ऐन पावसाळ्यात तळेगावकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सोमटणे पंप हाऊस येथून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तळेगाव शहरास सोमवार पासून पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही.

  • सोमटणे पंप हाऊस येथे 240 अश्वशक्तीचे दोन पंप, 150 अश्वशक्तीचा एक आणि 90 अश्वशक्तीचा एक विद्युत पंप आहे. मात्र या ठिकाणचा विद्युत ट्रान्सफॉर्मर पाण्याखाली गेल्याने तसेच जॅकवेलचा अर्ध्यापेक्षा अधिक भाग पाण्याखाली गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पंपाचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे.

आंबी येथील इंद्रायणी नदी पंप हाऊस येथील 100 अश्वशक्तीचा एक पंप बिघाड झाल्याने बंद आहे. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने पंपाची दुरुस्ती होणे कठीण झाले आहे. या ठिकाणाहून 100 अश्वशक्तीच्या एकाच पंपाद्वारे पाणी पुरवठा चालू असल्याने तळेगाव स्टेशन भागासही दोन दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अशीच परिस्थिती पंप दुरुस्त होईपर्यंत राहणार आहे. मावळ तालुक्यात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे पवना नदी आणि इंद्रायणी नदीला पूर आला असून त्या दुथड्या भरून वाहत आहेत.

  • पवना नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याशिवाय सोमटणे पंप हाऊस येथून पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच इंद्रायणी नदीची पाणी पातळी कमी झाल्याशिवाय येथील पंप दुरुस्त होणे शक्य नाही. पावसाचे संकट हे नैसर्गिक असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने करण्यात केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.