Talegaon : कोयत्याने वार करत दुचाकीस्वाराला लुटले

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असलेल्या इसमाच्या दुचाकीला आडवून त्याच्यावर कोयत्याने वार केले. दुचाकीस्वाराची 40 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 13) सकाळी आठच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी येथे घडली.

याप्रकरणी बाळू सोपान बनसोडे (वय 46, रा. मुकुंदनगर, आंबी, ता. मावळ) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळू बुधवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून (एम एच 14 / डी एस 7237) तळेगाव एमआयडीसी रोडवरून जात होते. आंबी सर्कल येथील अॅक्सेस अॅग्रो कंपनीजवळ आले असता तीन अनोळखी आरोपी दुचाकीवरून आले. आरोपींनी बाळू यांच्या दुचाकीला दुचाकी आडवी लावून थांबवले.

एका आरोपीने कोयत्याचा धाक दाखवला. त्यामुळे बाळू गाडी सोडून पळून जात होते. त्यावेळी आरोपींनी बाळू यांच्यावर कोयत्याने वार केले आणि 40 हजार रुपये किमतीची तीन तोळ्यांची सोन्याची चेन चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.