Talegaon : जैन समाजातील साधू, साध्वी यांना प्रवास करण्याची परवानगी द्यावी : आमदार सुनील शेळके

एमपीसीन्यूज : जैन समाजातील चातुर्मास निमित्त समाजातील साधू -साध्वी यांना प्रवास करण्याची परवानगी देण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

याबाबत आमदार शेळके यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जैन समाजाच्या चातुर्मास पर्वाला जुलै महिन्यात प्रारंभ होत आहे.

तसेच, चार महिने एकाच ठिकाणी रहाणे, ध्यान करणे, प्रवचन देणे अनेक तरुणांना मार्गदर्शन करण्याचे कार्य जैन साधू संत करीत असतात. चातुर्मास म्हणजे स्वत:ला समजून घेण्याची, कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मानली जाते.

या चातुर्मास काळात जैन साधूसंत निश्चित केलेल्या स्थळी पोहोचण्यासाठी पायी प्रवास करीत, तर काही वृद्ध संत साध्वी प्रकृतीच्या कारणास्तव व्हीलचेअरवरुन प्रवास करतात. अशा तऱ्हेने प्रवास करुन हे साधू- साध्वी चातुर्मास स्थळी विराजमान होतात. या साधूंसमवेत सेवकही असतात.

लॉकडाऊनमुळे हे साधू-साध्वी अनेक भागातून पायी प्रवास करू शकत नाहीत, मात्र चातुर्मास प्रारंभ होण्यापूर्वीच या सर्वांना निर्धारित स्थानी पोहोचणे आवश्यक आहे.

त्यामुळे साधू-साध्वी व सेवकांना पायी प्रवास करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासन यांना योग्य सूचना शासनाने निर्गमित करणे गरजेचे असल्याचे आमदार शेळके यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.