Talegaon : शहरातील सात जण कोरोना पॉझिटिव्ह

Seven in the city corona positive

0

एमपीसीन्यूज : पुण्यातील रहिवाशी आणि जनता सहकारी बँकेच्या तळेगाव दाभाडे शाखेतील 55 वर्षीय कोरोना बाधित व्यवस्थापकाच्या संपर्कातील 4 जणांसह तळेगाव दाभाडे येथील एकूण 7 जणांचा कोरोना चाचणी अहवाल आज, सोमवारी पाॅझिटिव्ह आला असल्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितले.

मावळ तालुक्यातील कोरोना बळीची संख्या चार झाली आहे. तर सक्रिय रूग्णांची संख्या 42 आहे. तळेगाव दाभाडे येथील जनता सहकारी बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करणा-या 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला होता.

त्यांच्या संपर्कातील 14 कर्मचाऱ्यांचे स्वॅब खाजगी लॅबमध्ये शनिवारी (दि. 27) तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तळेगाव दाभाडे येथे राहात असलेल्या अनुक्रमे वय 24, 52, 40व 29 वर्षीय अशा चार पुरुष कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल आज पाॅझिटिव्ह आला असल्याचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितले.

दरम्यान, तळेगाव दाभाडे येथील 51 वर्षीय व्यक्ती शुक्रवारी (दि. 26) वैयक्तिक कामाकरिता सातारा येथे जात होते. त्यावेळी शिरवळ येथील आरोग्य यंत्रणेकडून त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज (दि. 29) त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याचे तेथील आरोग्य यंत्रणेकडून कळविण्यात आले आहे.

त्याचबरोबर तळेगाव दाभाडे येथील 42 वर्षीय पुरूष व 34 वर्षीय महिला या पती, पत्नीला शनिवारी (दि 27) सर्दी, खोकला आदी लक्षणे जाणवत असल्याने ते खासगी रुग्णालयात तपासणी गेले होते. तेथील खाजगी लॅबमध्ये त्या दोघांचाही स्वॅब घेण्यात आला होता. आज या दोघांचाही कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

आज अखेर तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 30 पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या झाली आहे. त्यापैकी 6 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले असून सक्रिय रूग्णांची संख्या 23 आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ. प्रवीण कानडे यांनी दिली.

मावळातील कोरोनाबाधितांची संख्या शहरी 37 व ग्रामीण 50 अशी एकूण संख्या 87 झाली आहे. त्यापैकी 04 जणांचा मृत्यू झाला. 41 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सक्रिय रूग्णांची संख्या 42 आहे, अशी माहिती तहसीलदार बर्गे व तालुका आरोग्याधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून मावळकरांच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. मावळात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार बर्गे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like