Talegaon : खुनी हल्ला करणाऱ्या ‘त्या’ चार आरोपींना शिरगाव पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – कंपनीत चहा घेऊन जात असताना सात जणांनी मिळून तरुणावर पूर्ववैमनस्यातून खुनी हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना ही घटना शनिवारी (दि. 14) सायंकाळी सोमाटणे रस्त्यावर घडली. या प्रकरणातील एका आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने तर अन्य चार आरोपींना शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे.

प्रसाद उर्फ परशा टेभेकर (रा. उर्से), आकाश साळुखे (रा. सोमाटणे फाटा), हर्षल भोकरे, (रा. शिवणे), अनु उर्फ अनुराधा काळे (रा. तळेगाव दाभाडे) अशी शिरगाव पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. केतन दत्तात्रय पोकळे (वय 22, रा. सोमाटणे फाटा) पाचव्या आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. रोहन दिनकर गरोडे असे खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

जखमी रोहन आणि आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रोहन आणि त्याचा मित्र आदित्य त्यांच्या मोपेड दुचाकीवरून ब्लू डार्ट कंपनीत चहा घेऊन जात होते. ते परंदवडी सोमाटणे रोडवरील मुंजा ओढ्याजवळ वसंत पापळ यांच्या प्लॉटिंगजवळ आले असता आरोपी तीन मोटारसायकलवरून आले.

आरोपी प्रसाद याने लोखंडी कोयत्याने रोहनच्या डोक्यात आणि हातावर सपासप वार केले. त्यानंतर केतन पोकळे याने कोयता घेतला आणि त्याने देखील रोहनवर वार केले. अन्य आरोपींनी रोहनला लथाबुक्क्यांनी मारहाण केली. सर्वांनी मिळून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये रोहन गंभीर जखमी झाला. याप्रकरणी शिरगाव पोलीस चौकीत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने केतन पोकळे याला अटक केली. तर शिरगाव पोलिसांनी अन्य चार आरोपींना सोमवारी (दि. 16) रात्री अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.