Talegaon : दुधिवरे खिंडीतील जंगलात लपून बसलेल्या खुनी हल्ल्यातील चार आरोपींना शिरगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – कंपनीत चहा घेऊन जात असताना सात जणांनी मिळून तरुणावर पूर्ववैमनस्यातून खुनी हल्ला केला. ही घटना ही घटना शनिवारी (दि. 14) सायंकाळी सोमाटणे रस्त्यावर घडली. या प्रकरणातील चार आरोपींना लोहगडाच्या पायथ्याशी दुधिवरे खिंडीजवळ असलेल्या जंगलातून पाठलाग करून शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

प्रसाद उर्फ परशा सुनील टेभेकर (वय २२, रा. उर्से), आकाश श्रीरंग साळुखे (वय २३, रा. सोमाटणे फाटा), हर्षल प्रकाश भोकरे, (वय २२, रा. शिवणे), अनु उर्फ अनुराधा दिलीप काळे (वय २१, रा. तळेगाव दाभाडे) अशी शिरगाव पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

केतन दत्तात्रय पोकळे (वय 22, रा. सोमाटणे फाटा) पाचव्या आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. रोहन दिनकर गराडे (वय १९, रा. धामणे) असे खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी रोहन आणि आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रोहन आणि त्याचा मित्र आदित्य त्यांच्या मोपेड दुचाकीवरून ब्लू डार्ट कंपनीत चहा घेऊन जात होते. ते परंदवडी सोमाटणे रोडवरील मुंजा ओढ्याजवळ वसंत पापळ यांच्या प्लॉटिंगजवळ आले असता आरोपी तीन मोटारसायकलवरून आले.

आरोपी प्रसाद याने लोखंडी कोयत्याने रोहनच्या डोक्यात आणि हातावर सपासप वार केले. त्यानंतर केतन पोकळे याने कोयता घेतला आणि त्याने देखील रोहनवर वार केले. अन्य आरोपींनी रोहनला लथाबुक्क्यांनी मारहाण केली. सर्वांनी मिळून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये रोहन गंभीर जखमी झाला. याप्रकरणी शिरगाव पोलीस चौकीत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने केतन पोकळे याला अटक केली.

त्यानंतर, सोमवारी रात्री या प्रकरणातील चार आरोपी लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दुधिवरे खिंड परिसरातील जंगलात लपून बसले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घनदाट जंगलात शोधमोहीम सुरु केली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागले. पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून चौघांना देखील ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी रोहन गराडे याच्यावर खुनी हल्ला केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे, पोलीस कर्मचारी राकेश पालांडे, दीपक काठे, योगेश नागरगोजे, जयदीप कोठावळे यांच्या पथकाने केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.