Talegaon News : तळेगावातील गायिका विद्याताई अंबिके यांचे दु:खद निधन

एमपीसी न्यूज : कलापिनीच्या तसेच श्रीरंग कलानिकेतनच्या जेष्ठ कलाकार व आजीव सदस्या व ओजस्विनी भाव भक्ती गीत मंडळाच्या संस्थापिका व यशवंत नगर मधील गायन शिक्षिका विद्याताई अंबिके (वय ८१) यांचे काल रात्री आकस्मिक निधन झाले. त्यांचे वडील जेष्ठ संगीतकार शंकर विष्णु चांदेकर उर्फ दादा चांदेकर यांच्या कडून संगीताचा वारसा मिळालेल्या विद्याताईंनी मराठी चित्रपटात पार्श्वगायन ही केले होते.

कलापिनीच्या संगीत मंदारमाला नाटकात रत्नमाला या राज गायिकेची भूमिका केली होती. कलापिनीच्या या संगीत नाटकाला महाराष्ट्र रंगायन दिल्लीच्या आखिल भारतीय स्पर्धेत ८ पारितोषिके मिळाली होती व दिल्लीच्या संगीत नाट्य महोत्सवात सादरीकरणाचा  मान ही मिळाला होता. त्यावेळचे खासदार वसंत साठे व खासदार सुमित्रा महाजन या मान्यवरांनी प्रयोगाचे खुप कौतुक केले होते.

कलापिनीच्या ‘बोल बाबी बोल’ या त्यांची भूमिका असलेल्या नाटकाने कामगार कल्याण केंद्राच्या आणि  महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत  भरपूर पारितोषिके मिळवली होती. तळेगावच्या यशवंत नगर दिवाळी पाहत कार्यक्रमाच्या संयोजना मध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग होता.

कलापिनीच्या दिवाळी पाहत कार्यक्रमात ही त्यांचा सहभाग असायचा. स्वयंपाक घरातील भांड्यांचा वापर करून त्यांनी त्यांच्या ओजस्विनी भाव भक्ती गीत मंडळाच्या महिलांच्या मदतीने सादर केलेला वाद्यवृंद आजही तळेगावकर रसिकांच्या स्मरणात आहे व कायम राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.