Talegaon : शाळेच्या कार्यालयातून विद्यार्थ्यांची परीक्षा फी चोरली

एमपीसी न्यूज – एका शाळेच्या कार्यालयाच्या खिडकीचे गज वाकवून कार्यालयातील लोखंडी कपाटातून सुमारे 64 हजार 762 रुपयांची रोकड चोरून नेली. ही रक्कम विद्यार्थ्यांची बाह्य परीक्षा फी म्हणून जमा केलेली होती. ही घटना सोमवारी (दि. 1) सकाळी उघडकीस आली.

सिस्टर आयरिन सिल्वेस्टर रॉट्रिक्स (वय 60, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉट्रिक्स तळेगाव दाभाडे येथील माउंट अ‍ॅन्स हायस्कूलमध्ये नोकरी करतात. विद्यार्थ्यांच्या बाह्य परीक्षेसाठी परीक्षा फी जमा करण्यात आली होती. एकूण जमा झालेली सुमारे 64 हजार 762 रुपये फी शाळेच्या कार्यालयातील लोखंडी कपाटात ठेवली होती. शनिवारी (दि. 29) शाळा सुटल्यानंतर कार्यालय बंद केले.

दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या कार्यालयाच्या खिडकीचे गज वाकवून कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयातील लोखंडी कपाटाचे लॉक उघडून चोरट्यांनी सर्व रक्कम चोरून नेली. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शाळा उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.