Talegaon : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी; कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक येत्या शुक्रवारी (दि. 7 फेब्रुवारी) होणार आहे. या निवडणुकीत कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जनसेवा समितीचे नगरसेवक संग्राम काकडे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष पदाची जागा रिक्त आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मावळते उपनगराध्यक्ष संग्राम बाळासाहेब काकडे यांनी 29 जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्याकडे सुपूर्द केला. स्वतःच्या मर्जीने व राजीखुषीने पदाचा राजीनामा देत असल्याचे काकडे यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या म्हटले होते. काकडे यांचा राजीनामा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी मंजुर केला.त्यामुळे रिकाम्या झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रिक्त झालेली उपनराध्यक्ष पदाची जागा भरण्यासाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नगरपरिषदेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या नगराध्यक्षा चित्र जगनाडे या पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. या निवडणुकीदरम्यान मुख्याधिकारी दीपक झिंजाड हे सहाय्य करतील. येत्या शुक्रवारी दुपारी 12 पर्यंत नामनिर्देशपत्र दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर अर्जाची छाननी केल्यानंतर दुपारी साडेबारा पर्यंत अर्ज मागे घेता येतील.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भारतीय जनता पक्ष, जनसेवा विकास समितीची सत्ता आहे. त्यामुळे या निवडणुकीबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. निवडणुकीचे चित्र शुक्रवारी साडेबारापर्यंत स्पष्ट होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.