Talegaon : अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणी तळेगाव नागरपरिषदेस 79 कोटी 64 लाखांचा दंड : तहसीलदार बर्गे

Talegaon Municipal Council fined Rs 79.64 crore for illegal mining: Tehsildar Barge या तलावातून साधारण दोन लाख ब्रास इतकी मुरुम व माती अनाधिकृतपणे काढली आहे.

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरीषदेच्या हद्दीतील तळ्यातील माती व मुरुम यांची अनाधिकृतरित्या उत्खनन केल्याप्रकरणी तळेगाव नगरपरीषदेला 79 कोटी 64 लाख 94 हजार 600 रुपये दंड भरण्याचे आदेश मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी दिले आहे.

या संदर्भात तहसीलदार बर्गे यांनी दिलेल्या माहीतीनुसार तळेगाव दाभाडे कामगार तलाठी यांनी सादर केलेल्या अवहालानुसार तळेगाव दाभाडे येथील स. नं. 428  मधील नगरपरिषदेच्या क्षेत्रातील तलावामध्ये नगरपरिषदेने अनाधिकृतरित्या माती व मुरुम या गौणखनिजाचे उत्खनन केल्याचे निदर्शनास आले आहे.

या तलावातून साधारण दोन लाख ब्रास इतकी मुरुम व माती अनाधिकृतपणे काढली आहे.

याबाबत तळेगाव नगरपरिषदेस जमिन महसूल अधिनियम 1966चे कलम 48 (7) नुसार दंडात्मक कार्यवाही करण्याची नोटीस बजावली होती. त्यावर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी केलेला ख़ुलासा संयुक्तिक नसल्याचे दिसून आले.

त्यामुळे नगरपरिषदेने अनाधिकृतरित्या गौणखनिजाचे उत्खनन करुन विक्री केल्याचे सिध्द होत होते. त्यासाठी 2 लाख 376 ब्रास उत्खननासाठी प्रती ब्रास 400 रुपये प्रमाणे दंड ठोठावला आहे.

यानुसार रॉयलटीच्या पाचपट म्हणजे 79 कोटी 64 लाख 94 हजार 600 रुपये दंड भरण्याचे आदेश नगरपरिषदेस देण्यात आले आहेत.

येत्या 15  दिवसात ही दंडाची रक्कम न भरल्यास ती सक्तीच्या उपायाने वसूल केली जाईल, असा आदेश तहसीलदार बर्गे यांनी काढला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.