Talegaon : शिक्षकांची कामावर रुजू होण्यापूर्वी ‘कोविड 19’ची तपासणी करावी : गणेश खांडगे

एमपीसी न्यूज : शहरातील शैक्षणिक संस्थात काम करणाऱ्या आणि परगावी असलेल्या आणि अत्यावश्यक सेवेवर रुजू होणाऱ्या सर्व शिक्षकांची कामावर रुजू होण्यापूर्वी कोविड 19 ची कसून तपासणी करावी, अशी मागणी शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती गणेश खांडगे यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्याकडे केली आहे.

शहरात सुमारे 750 शिक्षक असून ते विद्यार्थ्यांच्या संपर्कात येण्यापूर्वी ही खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी ‘एमपीसी न्यूज’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

याबाबत नगरसेवक खांडगे यांनी मुख्याधिकारी झिंजाड दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण संस्थामध्ये अंदाजे 750 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. राज्य शासनाने त्यांना शहरामध्ये राहण्याबाबत सुचना दिलेल्या असताना देखील अनेक शिक्षक कुठल्याही प्रकारच्या पुर्व सुचना न देता वैयक्तीक कारणांसाठी शहर सोडून गेलेले आहेत.

कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाचे कडक निर्देश असताना देखील काही शिक्षकांनी या आदेशाची पायमल्ली केल्याचे निदर्शनास आले आहे. तरी बाहेरगावी गेलेल्या शिक्षकांबाबत कठोर पावले उचलून सर्व शिक्षकांना हजर करुन घेणे बाबत सुचना द्याव्यात, असे खांडगे यांनी सांगितले.

संबंधित शिक्षक हजर झाल्यानंतर सर्वेक्षणाच्या कामामध्ये नागरिकांशी व विद्यार्थ्यांशी संपर्कात येणार आहेत. बाहेरुन येणाऱ्या या कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करुन मगच सेवेत रुजू करुन घ्यावे. सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना आवश्यक त्या सुरक्षेच्या सुविधा पुरविण्यात याव्यात व त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असेही खांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.