Talegaon : मुलांचे अपहरण केल्याचा तो व्हायरल मेसेज ‘फेक’

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथून चार मुलांचे अपहरण केले असून त्यातील एक मुलगा इंदोरी जवळ सापडला असल्याचा मेसेज तळेगाव दाभाडे आणि परिसरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होणार हा मेसेज फेक असल्याची माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे. तसेच नागरिकांना फेक मेसेज व्हायरल न करण्याच आवाहन करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून तळेगाव दाभाडे आणि परिसरात सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ‘तळेगाव दाभाडे येथे कालपासून चार मुलांचे अपहरण केले आहे. त्यातील एक मुलगा इंदोरी जवळ सापडला आहे. मुलांचे अपहरण करणारे तोंड बांधून येतात. त्यांच्या गाडीची नंबर प्लेट झाकलेली असते. एका मुलाचे क्लासला जाताना, एकाचे भाजी मंडई आणि दोन मुलांचे यशवंतनगर येथून अपहरण करण्यात आले आहे. समृद्धी स्त्रीशक्ती ग्रुप, मावळ तालुका यांच्या वतीने सर्व पालकांना विनंती करण्यात येत आहे की, आपल्या मुलांवर लक्ष ठेवा, असे त्या फेक मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

हा मेसेज सोशल मीडियाद्वारे काही क्षणात सर्वत्र व्हायरल झाला. अनेक शाळांच्या सोशल मीडिया ग्रुपवर देखील तो पाहायला मिळाला. असे फेक मेसेज व्हायरल केल्याने समाजात अशांतता आणि भीतीचे वातावरण पसरत आहे. मुळात एक लहान मुलगा अभ्यास केला नसल्यामुळे घरच्यांच्या भीतीपोटी बाहेर निघून गेला होता. त्या मुलाचा शोध पोलिसांनी घेतला आहे. मात्र, मुलांचे अपहरण झाल्याची माहिती चुकीची असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासणे आवश्यक आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अटिंगरे म्हणाले, “लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना तळेगाव परिसरात कुठेही घडलेल्या नाहीत. गुरुवारी (दि. 26) वतननगर, तळेगाव स्टेशन येथील एक 15 वर्षाचा मुलगा अभ्यास न केल्याने घरच्यांच्या भीतीपोटी घरातून निघून गेला होता. तो मुलगा इंदुरीजवळ सापडला आहे. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता अभ्यास न केल्यामुळे घरच्यांच्या भीतीपोटी घरातून निघून गेल्याचे मुलाने सांगितले आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1