Talegaon : फास्ट पॅसेंजरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज – मुंबई-विजापूर या फास्ट पॅसेंजरच्या महिला डब्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी (दि. 14) तळेगाव रेल्वे स्टेशनवर करण्यात आली.

शंकर जगले, यशवंत वाघमारे, अशोक आडवाणी, समाधान वनवे, श्रीनिवास सिंगल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन चाकू ब्लेड व दोन मिरची पावडर असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-विजापूर फास्ट पॅसेंजर तळेगाव रेल्वे स्थानकावर पहाटे तीन वाजता येते. या पॅसेंजरमध्ये एक टोळी रेल्वे प्रवाशांवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून टोळीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे दरोड्यासाठी वापरला जाणारा ऐवज आढळून आला. त्यावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 18 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींची सखोल चौकशी आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्याचे काम लोहमार्ग पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.