Talegaon : कारची दुचाकीला धडक; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

The car hit the bike; Filing a crime against each other

0

एमपीसी न्यूज – कारचे पुढचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे या कारची एका दुचाकीला धडक बसली. यावरून दुचाकीस्वार आणि अन्य नागरिकांनी कार चालक आणि कारमधील व्यक्तींना बेदम मारहाण केली. तर कारची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याबाबत कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरव हनुमंत मुठे (वय 20, रा. पिंपरीगाव) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमेश दाभाडे आणि अन्य दोघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या कारमधून (एमएच 14 / वायए 4055) पुणे-मुंबई महामार्गावरून जात होते. फिर्यादी यांची कार त्यांचा मित्र सुदाम कोकर चालवत होता.

सोमाटणे टोलनाक्याच्या पुढे आल्यानंतर कारचे पुढचे टायर फुटले. त्यामुळे चालक सुदाम याचे कारवरील नियंत्रण सुटले. यामध्ये समोर जाणा-या एका दुचाकीला कारची धडक बसली.

त्यामुळे दुचाकीस्वार खाली पडला. कार पुढे जात असताना एका ढाब्यासमोर आरोपींनी फिर्यादी यांची कार अडवली आणि सुदाम याला मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या अन्य तीन मित्रांना देखील मारहाण केली.

याबाबत जखमी दुचाकीस्वाराने देखील एमएच 14 / एई 4055 या कारच्या चालका विरोधात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तेजस दत्ता कालेकर (रा. किवळे) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे टोलनाक्याच्या पुढे पुणे-मुंबई महामार्गावरून जात असताना आरोपीने त्याच्या कारने कालेकर यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये कालेकर जखमी झाले. तसेच दुचाकीचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like