Talegaon : मावळातील युवकांनी अजिंक्य सावंतचा आदर्श घ्यावा – आमदार सुनील शेळके

The youth of Maval should follow the example of Ajinkya Sawant - MLA Sunil Shelke

एमपीसीन्यूज : नुकताच राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागला असून यात मावळातील गोडुंब्रे गावातील शेतकऱ्याचा मुलगा अजिंक्य दत्तात्रय सावंत याने यश मिळवत मावळातील पहिला तहसीलदार होण्याचा मान मिळविला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी अजिंक्य सावंत याची भेट घेऊन त्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच मावळ तालुक्यातील तरुणांनी अजिंक्यचा आदर्श घ्यावा, असे मत व्यक्त केले.

अजिंक्यचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण सोमाटणे येथील तुळजा भवानी विद्यालयात झाले. तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरींग काॅलेजमधून अजिंक्यने बी ई इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन ही पदवी प्राप्त केली आहे.

त्यानंतर काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने तो स्पर्धा परिक्षेकडे वळला.

_MPC_DIR_MPU_II

गोडुंब्रे गावातील एकत्र कुटुंबातील अजिंक्यच्या आई वडीलांचा शेती आणि दुग्ध व्यवसाय आहे. आईवडिलांचे आशीर्वाद आणि बहीण भावाचे पाठबळ अजिंक्यच्या पाठीशी होतेच.

यावेळी आमदार शेळके म्हणाले, मावळातील युवकांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून प्रशासकीय सेवेत येऊन जनतेची सेवा करावी. या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणे गरजेचे आहे.

पुण्यासारख्या सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध असणाऱ्या जिल्ह्यातील मावळातील युवकांची संख्या शासकीय सेवेत अतिशय कमी आहे. यामुळे मावळातील युवक व युवतींनी अजिंक्य सावंत याचा आदर्श घेऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून शासकीय सेवेत यावे, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.