BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : तिसऱ्यादिवशीही बेमुदत उपोषण सुरूच; प्रकृती खालवल्याने एक कामगार रुग्णालयात

प्रशासनास 14 दिवस होऊनही तोडगा निघेना

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – तळेगाव आंबी एमआयडीसीमधील एल अँड टी कंपनीतील सुमारे 200 कामगारांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ कामगारांनी गेटवर सुरू केलेल्या आंदोलनास 14 दिवस होऊनही तोडगा निघालेला नाही. कंपनी व्यवस्थापनाचे आडमुठे धोरण आणि काही अधिकारी आणि बडे ठेकेदार यांच्यातील ‘अर्थ’मय साटेलोटे यामुळे स्थानिक कामगारांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले असल्याचा आरोप शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अॅड. विजय पाळेकर यांनी आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

  • दरम्यान, 8 तारखेपासून सुरु झालेल्या आमरण उपोषणाला बसलेल्या चार कामगारांपैकी महेश वैजनाथ बिराजदार, आनंद चंदू दंडगल, सदानंद राजाराम मुत्केकर हे कायमस्वरूपी कामगार असून नवनाथ देवराम गायकवाड हे कंत्राटी कामगार आहे. त्यापैकी सदानंद मुत्केकरची प्रकृती ढासळल्याने त्याला तळेगाव दाभाडे येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एल अँड टी कंपनीतील कामगारांच्या प्रमुख मागण्या एल अँड टी डिफेन्सच्या पवई येथील दुसऱ्या शाखेत मिळत असलेल्या सोयीसुविधा आमच्याही शाखेतील कामगारांना मिळाव्यात. बेकायदेशीररित्या कामावरून कमी केलेल्या 9 कायमस्वरूपी कामगारांना त्वरित कामावर रुजू करून घ्यावे. सलग 8 ते 10 वर्ष (Without Break System) कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना कायम कामगार म्हणून रुजू करून घ्यावे.

  • सर्व कामगार डिप्लोमा आणि आयटीआयधारक असूनही त्यांना गेली 9 ते 10 वर्ष होवूनही पगारवाढ नाही आणि कसल्याही सोयी सुविधा नाही. कंपनीचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात साटंलोटं असल्याने हे आंदोलन कंपनीच्या विरोधात नसून तेथील कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव पाळून मावळ भागातील 140 कंत्राटी कामगारांना कोणतीही सवलत मिळत नाही. मावळातील 140 भूमिपुत्रांना काढल्यानंतर त्यांच्या जागी कंपनी व्यवस्थापनाने बाहेरील कामगारांची भरती केली आहे. त्यामुळे स्थानिक कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अॅड. पाळेकर म्हणाले, व्यवस्थापनाशी अनेकदा निवेदने, चर्चा केल्या आहेत. त्यास प्रतिसाद न मिळाल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मावळ तहसीलदार आणि कामगार आयुक्त कार्यालयाकडे धाव घेतली. तरीही कंपनीचे काही अधिकारी आडमुठे धोरण घेत आहेत. तहसीलदार रणजित देसाई यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील सामोपचाराने हा प्रश्न सोडविण्याच्या निर्णयास देखील व्यवस्थापनाने कचऱ्याची टोपली दाखविली आहे.

  • एकूण 190 कामगार गेटवर उपोषणास बसले आहेत. त्यापैकी 49 कायमस्वरूपी, तर 140 कामगार ठेकेदारीवर काम करीत आहेत. कंपनी व्यवस्थापनाने यापैकी समाधानकारक काम करत नसल्याचे कारण दाखवून 9 कायमस्वरूपी व 140 कंत्राटी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकले आहे. यात बाहेरील बड्या ठेकेदारांना मोठा आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी काही अधिकारी मोठा भ्रष्टाचार करण्यासाठी मदत करत आहेत. असा आरोप उपोषणकर्त्या कामगाराने यावेळी केला.

यावेळी पाळेकर म्हणाले की, स्थानिकांना आणि भूमिपुत्रांना रोजगार मिळावा, कायद्याचे संरक्षण व त्यांना न्याय मिळावा. व्यवस्थापनाने सामंजस्याची भूमिका घेणे महत्वाचे आहे, स्थानिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी सर्व पक्षीय स्थानिक नेत्यांनी एकत्रित प्रयत्न केला पाहिजे असेही पाळेकर म्हणाले.

HB_POST_END_FTR-A4

.