Talegaon : रस्त्यावरील केबलमध्ये अडकून बुलेटस्वाराच्या मृत्यूप्रकरणी त्वरित कारवाई करा, अन्यथा आंदोलन करणार; नातेवाईकांचा इशारा

एमपीसी न्यूज – जुलै 2019 मध्ये रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या (केबल)वायरमध्ये अडकून एका बुलेटस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाच महिने उलटूनही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.

याबाबत नातेवाईकांनी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना निवेदन दिले आहे. सुदाम तुकाराम भेगडे (रा. तळेगाव दाभाडे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अजय तुकाराम भेगडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञातांवर गुन्हा दाखल केला होता.

5 जुलै 2019 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुदाम भेगडे त्यांच्या बुलेटवरून तळेगाव स्टेशन चौकाकडून जिजामाता चौकाकडे जात होते. दरम्यानच्या रस्त्यावर तुटलेली केबल वायर बुलेटच्या चाकामध्ये आणि अपघात झाला. सुदाम हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत मयत अजय यांच्या पत्नी रुपाली सुदाम भेगडे यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सुदाम भेगडे यांच्या मृत्यूबाबत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पोलिसांनी संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी. नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी वैभव आवारे यांच्यासह DEN या केबल मालकावर गुन्हा दाखल करावा.

केबल टाकण्यासाठी आणि केबलच्या कामासाठी संबंधितांनी नगरपालिकेकडे परवानगी घेतली आहे का? याची सखोल चौकशी करावी. पीडित कुटुंबाला दोन कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी. या मागण्या पूर्ण न केल्यास नगरपालिकेसमोर संपूर्ण पीडित कुटुंब आंदोलन करणार असल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.