Talegaon : सीआरपीएफ तळेगाव येथे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली

इंडो सायकलिस्ट क्लबच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गजानन खैरे व गणेश भुजबळ यांच्या मार्फत पुष्पचक्र अर्पण

एमपीसी न्यूज – इंडो सायकलिस्ट क्लब (आयसीसी) तर्फे पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना सीआरपीएफ तळेगाव येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पुणे, हडपसर, नांदेड सिटी, कोथरूड, खराडी या सर्व ठिकाणाहून सर्व सायकलिस्ट रावेत येथे आणि नंतर तळेगाव सीआरपीएफ ग्रुप सेंटर या ठिकाणी जमा झाले. त्याचबरोबर काही सायकलिस्ट देहूरोड, वडगाव, लोणावळा येथून आले. सुमारे नव्वदहून अधिक सायकलिस्ट या श्रद्धांजली सभेत सहभागी झाले.

  • असिस्टंट कमांडंट विनोद पंत यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वजण सकाळी सात वाजता शहीद स्मारक सीआरपीएफ ग्रुप सेंटर येथे जमा झाले. सुरुवातीला सीआरपीएफ तर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर इंडो सायकलिस्ट क्लबच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गजानन खैरे व गणेश भुजबळ यांच्या मार्फत पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी स्मारकाचे दर्शन घेत पाच मिनिटे शांतता पाळून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

असिस्टंट कमांडंट विनोद त्यांनी पुलवामा येथे घडलेल्या प्रकाराबद्दल दुःख व्यक्त करत सीआरपीएफचे कार्य कोणकोणत्या ठिकाणी व कसे चालते याबाबत माहिती दिली. आयसीसीचे सल्लागार धनंजय शेडबाळे यांनी आपण नेहमी देशाच्या सैनिकांच्या मागे आहोत, देशाची काळजी घेणाऱ्या सैनिकांची काळजी घेणे ही देशातील नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे, असे सांगितले.

  • ‘इंडो सायकलिस्ट क्लबचे मेंबर्स सर्व भारतभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या नजरेस असे काही कृत्य आल्यास त्यांनी लगेच जवळच्या आर्मी सेंटर किंवा पोलिसांना माहिती द्यावी. तसेच आपल्या सोसायटीमध्ये विघातक कृत्यांपासून सतर्क कसे राहता येईल’ याबाबत क्लबचे वरिष्ठ सदस्य शंकरजी उणेचा यांनी मार्गदर्शन केले.

आयसीसीचे श्रीकांत वतस, सुशील मोरे, गिरीराज उंबरिकर, राहुल नलावडे, सतिश पावसे, संजय ढवळे, शंकर गाढवे, राजेश शेटे, संदीप परदेशी, मयूर कंकराज, स्वप्नील तायडे आदींनी श्रद्धांजली सभेचे नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.