Talegaon : ट्रक विकत घेण्याच्या बहाण्याने साडेबारा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – दोघांनी मिळून एका ट्रकचा व्यवहार 13 लाख 38 हजार रुपयांना केला. त्यातील 80 हजार रुपये ट्रक मालकाच्या खात्यावर ट्रान्स्फर केले. उरलेले 12 लाख 58 हजार रुपये मूळ मालकाला न देता दोघांनी मिळून ट्रक अन्य व्यक्तीला परस्पर विकला. हा प्रकार 29 ऑक्टोबर 2018 ते 4 डिसेंबर 2018 या कालावधीत सोमाटणे येथे घडला.

गणेश रोहिदास जाधव (वय 35, रा. सोमाटणे गाव, ता. मावळ. मूळ रा. क्षीरसागर देशमुख, जि. बुलढाणा) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुजाहुद्दीन सय्यद, तस्लीम रफुद्दीन (दोघे रा. कोंढवा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी गणेश यांचा ट्रक (एम एच 14 / जी यु 0271) 13 लाख 38 हजार रुपयांना विकत घेतो असे सांगितले. ठरलेल्या रकमेपैकी 80 हजार रुपये आरोपींनी गणेश यांच्या बँक खात्यावर पाठवले. उरलेल्या रकमेचे लोन करतो असे सांगून आरोपी ट्रकची मूळ कागदपत्रे घेऊन गेले. उरलेले पैसे कोणत्याही माध्यमातून न देता आरोपींनी गणेश यांचा ट्रक परस्पर 8 लाख रुपयांना अन्य व्यक्तीला विकला. तसेच ट्रकवर 12 लाख 38 हजार रुपयांचे कर्ज काढले. गणेश यांना पैसे न देता त्यांच्याकडून मूळ कागदपत्रे घेऊन त्याचा अपहार करून गणेश यांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.