Talegaon Dabhade : आंतरजातीय तरुणाशी प्रेमसंबंध ठेवल्याने चुलत्याने लावले पुतणीच्या डोक्याला पिस्तूल

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चुलत्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – आंतरजातीय तरुणाशी प्रेमसंबंध ठेवल्याने चुलत्याने पुतणीच्या डोक्याला पिस्तूल लावून तिला डांबून ठेवले. तसेच पुतणीसह तिच्या प्रियकराला ठार मारण्याची धमकी दिली. तरुणीने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुरुवातीला स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार तरुणीने चुलत्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

चुलता दत्तात्रय बंडू शेटे, रवी निवृत्ती शेटे, संपत ज्ञानेश्वर शेटे (सर्व रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. प्रियंका संतोष शेटे (वय 19, रा. दौंड) या तरुणीने याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तीन वर्षांपूर्वी तळेगाव येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तरुणीची विराज मोहन अवघडे याच्याशी ओळख झाली. पुढे या ओळखीचे मैत्रीण आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तरुणी पुणे येथे गेली. विराज आणि तरुणीचे प्रेमसंबंध सुरु होते. याबाबत तरुणीच्या घरच्यांना समजले. मुलीचे प्रेमसंबंध आणि त्यात मुलगा अन्य जातीचा असल्याने तरुणीच्या घरच्यांना हे प्रेमसंबंध मान्य नव्हते. यावरून तरुणीचे घरच्यांशी भांडणही झाले.

तरुणीचे आई-वडील तळेगाव येथे राहत होते. हे प्रकरणात समजल्यानंतर चुलते दत्तात्रय शेटे यांनी तरुणीला तळेगाव येथून तिच्या मूळ गावी शेटे वस्ती, नवलाख उंब्रे येथे नेले. तिला हाताने मारहाण करून तिच्या डोक्याला पिस्तूल लावून तिला आणि विराजला ठार मारण्याची धमकी दिली. तरुणीचे बाहेर फिरण्याचे सर्व मार्ग आरोपींनी बंद केले.

त्यानंतर तरुणी तिच्या घरच्यांसोबत देवदर्शनासाठी रेल्वेने जात होती. दरम्यान तरुणीने विराजशी संपर्क साधला आणि दौंड रेल्वे स्थानकावर भेटण्याचे ठरले. रेल्वे दौंड रेल्वे स्थानकावर येताच तरुणीने काहीतरी कारण काढून विराज सोबत धूम ठोकली. मुलगी विराज सोबत पळून गेल्याने तरुणीच्या घरच्यांनी विराजच्या घरच्यांना फोन करून विराज आणि तरुणीला ठार मारण्याची धमकी दिली.

विराजचे कुटुंब या धमकीने पुरते घाबरून गेले. त्यामुळे तरुणीने विराज आणि त्याच्या कुटुंबासह मुंबई गाठली आणि उच्च न्यायालयात वकिलामार्फत याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने सुरुवातीला या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 मे रोजी होणार आहे.

आंतरजातीय प्रेमसंबंध आणि प्रेमविवाह मान्य नसल्याने नातेवाईकांकडून अत्यंत टोकाची भूमिका घेतली जात आहे. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या चुलत्याने जावयावर गोळीबार केल्याची घटना दोन दिवसापूर्वी चांदणी चौक येथे घडली होती. चुलत्याने जावयावर पाच गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेतील तरुण सध्या एका खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा चुलत्याने पुतणीला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.