Talegaon : यशस्वी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘शाळा विद्यार्थ्यांच्या घरी’; परांजपे शाळेचा अनोखा उपक्रम

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील अ‍ॅड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर शाळेच्या माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता दहावी) यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रतिवर्षी समारंभपूर्वक सत्कार केले जातात. यावर्षी कोरोनाच्या या अपवादात्मक परिस्थितीत ते शक्य झाले नसल्याने ‘शाळा विद्यार्थ्यांच्या घरी’ या संकल्पनेतून सोशल डिस्टन्सिंग ठेवून ‌व खबरदारीचे उपाय सांभाळून प्रथम तीन विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानी मोजक्याच शिक्षकांनी जाऊन प्रातिनिधिक स्वरूपात भेटवस्तू देऊन सन्मानित करत शाळेने अनोखा उपक्रम राबवला.

तळेगाव शहरातील आय.एस.ओ. मानांकन प्राप्त मावळ पंचक्रोशीतील नामांकित माध्यमिक शाळा अ‍ॅड.पु.वा.परांजपे विद्यालयाचा एस.एस.सी.परीक्षा मार्च 2020 चा निकाल 98.24 टक्के लागला असून प्रथम तीन विद्यार्थी अनुक्रमे साक्षी लक्ष्मण जाधव 94.40 टक्के, अविनाश त्रिलोक सावंत व श्रावणी धनाजी जाधव 92.40 टक्के, ॠषिकेश चंद्रकांत ‌गादगे 91.40 टक्के यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

विद्यार्थ्यांचे प्रतिवर्षी शाळेत समारंभपूर्वक सत्कार केले जातात. परंतु यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने शाळा बंद आहेत. यावर्षी परांजपे शाळेने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. शाळा विद्यार्थ्यांच्या घरी या संकल्पनेनुसार सोशल डिस्टन्सिंग ठेवून ‌व खबरदारीचे उपाय सांभाळून प्रथम तीन विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानी मोजक्याच शिक्षकांनी जाऊन प्रातिनिधिक स्वरूपात भेटवस्तू देऊन सन्मानित केले.

शाळेचे मुख्याध्यापक भगवान ‌शिंदे, ज्येष्ठ अध्यापक धनंजय नांगरे,वैशाली कोयते, नरेंद्र इंदापुरे, वर्षाराणी गुंड, संपत गोडे या अध्यापकांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे नियोजन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण ‌झाले आहे.

नुकत्याच एन.एम.एम.एस.परीक्षेत विद्यालयाचे बालाजी आरदवाड व अभिषेक शेलार हे दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकलेले आहेत.

या स्तूत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार सुरेशभाई शहा, शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.