Talegaon : ‘विश्वकर्मा एम्प्रेस इंटरनॅशनल स्कूल’ने फी वाढीचा निर्णय मागे घ्यावा; अन्यथा लाॅकडाऊननंतर तीव्र आंदोलन – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील ‘विश्वकर्मा एम्प्रेस इंटरनॅशनल स्कूल’ने 2020-2021 या शैक्षणिक वर्षासाठी 15% फी वाढीचा निर्णय घेतला असून ती फी भरण्यासाठी पालकांना वारंवार दबाव टाकला जात आहे. फी वाढीचा निर्णय मागे घ्यावा; अन्यथा लाॅकडाऊननंतर तीव्र आंदोलन करू, असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी दिला आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काढलेल्या आदेशानुसार 2020-2021 या शैक्षणिक वर्षासाठी कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक शुल्कामध्ये वाढ न करण्याची सूचना शैक्षणिक संस्थांना केली होती. मात्र, तळेगाव दाभाडे येथील ‘विश्वकर्मा एम्प्रेस इंटरनॅशनल स्कूल’ने 2020-2021 या शैक्षणिक वर्षासाठी 15% फी वाढीचा निर्णय घेतला असून ती फी भरण्यासाठी पालकांवर वारंवार दबाव टाकला जात आहे.

या निर्णयाविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते नाईक यांनी आवाज उठवला असून शाळेने फी वाढीचा निर्णय मागे घेतला नाही तर लाॅकडाऊन नंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

राज्य सरकारने अशा शैक्षणिक संस्था विरोधात योग्य कारवाई करावी तसेच वेळेप्रसंगी शाळेस टाळे ठोकावे, अशा मागणीचे निवेदन प्रदिप नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविले आहे.

लाॅकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरा पैसा असताना शैक्षणिक संस्थांनी फी वाढ करणे कितपत योग्य आहे. सरकारने या प्रकरणी लक्ष घालून त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी नाईक यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.