Talegaon: पै.विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुलात कोविड केअर सेंटर करू नये- किशोर भेगडे 

Vishwanathrao Bhegade Sports Complex should not have Covid Care Center - Kishor Bhegade

एमपीसी न्यूज – शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पै विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुलात प्रशासन कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा घाट घालत आहे. मात्र हे क्रीडा संकुल शहराच्या मध्यवर्ती असून या भागात सर्रास नागरिकांची येजा सुरू असते.

व्यापारी संकुल, शाळा जवळच असल्याने या क्रीडा संकुलात कोविड केअर सेंटर सुरू करणे धोक्याचे आहे. अनेक नागरिकांच्या आरोग्याला याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे हे कोविड केअर सेंटर सुरू करू नये, अशी मागणी नगरसेवक किशोर भेगडे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

भेगडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथे नगरपरिषदेने नव्यानेच बांधलेल्या पैलवान विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुलामध्ये तळेगाव मध्ये वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या रूग्णांच्या संख्येमुळे covid-19 कक्ष उभारण्याचा फतवा मावळ मुळशीचे प्रांत संदेश शिर्के यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला दिला आहे.

पैलवान विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुल इमारत गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. या इमारतीच्या बाजूला संभाजीनगर नावाची मोठी नागरी वसाहत आहे. चावडी चौक येथे असलेली कन्या शाळा मोडकळीस आल्याने मागील सर्वसाधारण सभेमध्ये तिला दुरुस्त करून घ्यावी असा ठराव सर्वानुमते झालेला आहे. त्या शाळेत असलेले विद्यार्थ्यांची शाळा या संकुलाच्या इमारतीमध्ये घ्यावी असे ठरवण्यात आले आहे तसेच या शाळेलगत भाजीपाल्याचा मोठा बाजार रोज भरत आहे व याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. त्याचबरोबर नगरपरिषदेने सध्या याठिकाणी अद्ययावत असे व्यापारी संकुल या इमारतीच्या बाजूला बांधले आहे. इयत्ता दहावीचे वर्ग देखिल याच इमारती लगत असलेल्या नथूभाऊ भेगडे शाळेमध्ये भरत आहे. या इमारतीच्या बाजूला तळेगावातील मुख्य रस्ता असल्याने नागरिकांची रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येनं ये-जा होत असते.

या परिसरातील तसेच येथे कामानिमित्त येणा-या नागरिकांना यामुळे कोरोना या आजाराचा संसर्ग होण्याची संभावना अधिक आहे. याठिकाणी जर कोरोना केअर सेंटर व उपचार केंद उभारले तर तळेगांवकर नागरिकांच्या आरोग्यास निश्चितच धोका निर्माण होऊ शकतो.

भविष्यातील रूग्णांची संख्या वाढ न होणे करिता व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पै विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुल इमारत येथे कोविड केअर सेंटर (CCC) करण्यात येऊ नये अशी आग्रही मागणी भेगडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.